संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होताच मस्साजोग ग्रामस्थांना त्यांचे आवाहन; विरोधकांच्या टीकेलाही दिले उत्तर
संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होताच मस्साजोग ग्रामस्थांना त्यांचे आवाहन; विरोधकांच्या टीकेलाही दिले उत्तर
मुंबई (प्रतिनिधी)
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये न्यायालयीन लढाई लढण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आसुन मस्साजोगचे ग्रामस्थ आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी ही मागणी लावून धरली होती.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना निकम म्हणाले की, माझ्या नियुक्तीकरता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मागणी केलेली होती. त्याचप्रमाणे त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. हे ऐकून मी व्यथित झालो होतो. म्हणून मी काल मुख्यमंत्र्यांना कळवलं आणि खटला चालवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी तसे आदेश काढले आहेत.
”मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मस्साजोगच्या ग्रामस्थांना आवाहन करेल की त्यांनी उपोषण सोडावं. कारण या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. त्यामुळे आपण कुठलंही असं कृत्य करु नये जेणेकरुन प्रकृतीला त्रास होईल.”
या खटल्यातील तपास यंत्रणा जेव्हा आरोपपत्र दाखल करतील तेव्हा हा खटला आम्ही चालवण्यास घेऊ, एवढं मी आश्वासित करतो. माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील, याची मला कल्पना होती. विरोधक काहीही म्हटले तरी मी माझ्या कर्तव्यामध्ये कसूर करणार नाही.” असंही ते म्हणाले.
अॅड. निकम म्हणाले की, विरोधकांच्या भूमिकेवरुन मुख्यमंत्र्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की, यापूर्वीही राजकारणात विरोधी पक्षाचे अनेक वकील होते. मी राजकारणात सक्रीय नव्हतो. जरी मी राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कुणी आडवं येऊ शकत नाही. विरोधकांचं जे म्हणणं असेल त्याला मी काही महत्व देत नाही. कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे.
दरम्यान, मस्साजोगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ज्या सात मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु झालं होतं. त्यातील एक मागणी मान्य झाली आहे. इतर सहा मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलिस अधिकारी मस्साजोगमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.