ऍंपा क्रिकेट चॅम्पियन्स चषक स्पर्धा – २०२५.वैद्यनाथ संघ विजेता तर सनरायजर्स संघ उपविजेता
*ऍंपा क्रिकेट चॅम्पियन्स चषक स्पर्धा – २०२५.वैद्यनाथ संघ विजेता तर सनरायजर्स संघ उपविजेता
*_डॉ.राजेश इंगोले ठरले ‘द मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ तर डॉ.प्रदीप सोनवणे ‘मालिकावीर’ पुरस्काराने सन्मानित_*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत वैद्यनाथ संघास विजेतेपद तर सनरायझर्स संघास उपविजेतेपद मिळाले.
दोन्ही तुल्यबळ संघात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात वैद्यनाथ संघाने अखेर बाजी मारली. साखळी सामन्यांमध्ये सलग चार विजयांचा धडाका लावत सनरायझर्स संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला होता. त्यांचा विजयाचा वारू अंतिम फेरीमध्ये मात्र वैद्यनाथ इलेव्हन संघाने आडवत त्यांना मात दिली. अंतिम सामन्यामध्ये वैद्यनाथ इलेव्हन संघाने सनरायझर्स संघाला दहा षटकांत विजयासाठी एकशे सोळा धावांचे लक्ष दिले. परंतु, सनरायझर्स संघाला केवळ शंभर धावा करता आल्या. कर्णधार प्रदीप सोनवणे यांच्या ३२ चेंडूतील तडाखेबंद ७० धावांमुळे वैद्यनाथ संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले डॉ.प्रदीप सोनवणे यांना स्पर्धेतील मालिकावीर आणि अंतिम सामन्यातील सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेमध्ये सनरायझर्स संघाला आपल्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीने अंतिम फेरीपर्यंत नेलेल्या डॉ.राजेश इंगोले यांना अंतिम फेरीत मात्र आपल्या संघास विजय प्राप्त करून देण्यात अपयश आले. पाच पैकी चार सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकविणारे डॉ.राजेश इंगोले यांना स्पर्धेतील ‘द मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ या अत्यंत महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.राजेश इंगोले यांनी पाच सामन्यात ६७ च्या सरासरीने २५० धावा तर गोलंदाजी करताना चार सामन्यांमध्ये सात बळी मिळवून अष्टपैलू कामगिरी केली त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी अनेक डॉकटर्स तसेच क्रिकेटप्रेमींनी मैदानावर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, संपादक बालाजी तोंडे, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सामन्यासाठी पंच म्हणून बिंबीसार वाघमारे व संघर्ष इंगळे, स्कोअरर म्हणून चाफा भडके व प्रा.अनंत कांबळे तर समालोचक म्हणून डॉ.देवराव चामनर, डॉ.सचिन कस्तुरे, डॉ.संदीप जैन यांनी कामगिरी बजावली. या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी ऍंपाच्या कार्यतत्पर अध्यक्षा डॉ.सुलभा पाटील, उपाध्यक्ष डॉ.सुनील नांदलगावकर, सचिव डॉ.ऋषिकेश घुले, क्रीडासचिव डॉ.बी.डी.माळवे, डॉ.नजीरूद्दीन, डॉ.विवेक मुळे यांनी परिश्रम घेतले. क्रीडासचिव डॉ.बी.डी.माळवे यांनी यावेळी अत्यंत कल्पकतेने डॉक्टर्सच्या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले, त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सहृदय सत्कार करण्यात आला. योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानात सुरू असलेल्या ह्या क्रिकेट स्पर्धा अत्यंत जल्लोषात व अनोख्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या.
=======================
=======================
