अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूच्या टिप्पर खाली दबून अख्ख कुटुंब संपलं, मध्यरात्री वाळूचा टिप्पर घरावर ओतल्यानं 5 जणांचा दुर्देवी मृत्यू
अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूच्या टिप्पर खाली दबून अख्ख कुटुंब संपलं, मध्यरात्री वाळूचा टिप्पर घरावर ओतल्यानं 5 जणांचा दुर्देवी मृत्यू
जालना
अवैध पद्धतीने वाहतूक केल्या जाणाऱ्या वाळूचा टिप्पर घरावर ओतल्याने त्या वाळूखाली दबून एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात मध्यरात्री घडल्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा वरून प्रशासना विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारातील पुलाच्या बांधकामासाठी हे कुटुंब आलेलं होतं. बांधकामाच्या नजीकच एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आपला संसार थाटलेला होता.
पंचनामा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊ नयेत, असा ठाम पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. शनिवारी (22 फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असून अवैध वाळू वाहतुकीचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. या प्रयत्नाअंती वाळूच्या ढिगाऱ्याखालून एका लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे.
पंचनामा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊ नयेत, असा ठाम पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेलं होतं.
मध्यरात्री साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
कसा उघडकीस आला हा प्रकार?
या शेडच्या समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर टिप्परचालकाने तिथून पळ काढला.
या महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणलं. त्यानंतर त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढलं. त्यापैकी एका 12 वर्षीय मुलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. मात्र, इतर पाच जणांचा जागीच दबून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय 50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय 40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, (वय 20) रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव यांचा समावेश आहे. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत. स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता. या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा गावकरी करत आहेत.
गावकऱ्यांनी घेतला ठाम पवित्रा
पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.बांधकामाच्या नजीकच एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आपला संसार थाटलेला होता.
अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी दिली असून राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळू उपसा सुरू आहे. राजकीय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकार्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत, असा दावा गावकरी करतात.
