रमेश आडसकरांनी सर्व नियमांची पूर्तता करत संतोष देशमुखांच्या पत्नीला दिली आपल्या संस्थेत नोकरी
रमेश आडसकरांनी सर्व नियमांची पूर्तता करत संतोष देशमुखांच्या पत्नीला दिली आपल्या संस्थेत नोकरी
केज (प्रतिनिधी)
मयत संतोष देशमुख कुटुंबीयांना भेटायला आलेल्या काही नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली, काहींनी आर्थिक मदत केल्या नंतर संतोष देशमुख यांच्या पत्नीला भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी आपल्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली आहे.
संतोष देशमुख यांचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला आहे, त्यांच्या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र, या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही बेपत्ता आहे. त्याला तातडीने अटक करून या प्रकरणातील मेन सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांतून निषेध मोर्चा काढून देशमुख कुटुंबीय न्याय मागत आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपींना अजूनही अटक होऊ शकलेली नाही.
देशमुख यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्रातील अनेक नेते, संस्थांचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांनी भेटून मदतीचा शब्द दिला आहे. काही नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. काहींनी रोख स्वरूपात देशमुख कुटुंबीयांना मदत केली आहे. याशिवाय मानसिक आधारासह इतरही गोष्टींची मदत केली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना माजलगावमधील नेते रमेश आडसकर यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेत नोकरी दिली आहे. आडसकर यांनी अश्विनी देशमुख यांना नोकरी देताना सर्व शासकीय सोपस्करही पूर्ण केले आहेत. भाविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
अश्विनी देशमुख यांना कनिष्ठ लिपिक म्हणून आडसकर यांच्या शैक्षिणक संस्थेत नोकरी देण्यात आलेली आहे. ही नोकरी देताना राज्य सरकारकडूनही मदत झाली आहे. कनिष्ठ लिपिक पदावर अश्विनी देशमुख यांची निवड करण्यासाठी जी प्रक्रिया होती, ती शासकीय प्रक्रिया अडसर ठरत होती. मात्र, अश्विनी देशमुख यांच्यासाठी नियमात सवलत देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना एक प्रकारचा आधार मिळाला आहे.
