मित्राने पळवलं अन् चौघांनी साधला डाव, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने केला अत्याचार
मित्राने पळवलं अन् चौघांनी साधला डाव, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने केला अत्याचार
वर्धा (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आसून पीडित मुलीला तिचाच अल्पवयीन मित्र आपल्या घरी घेऊन गेला होता. तिथे त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या चार जणांनी देखील अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 10 फेब्रुवारीला सोमवारी सकाळी पीडितेचा अल्पवयीन मित्र तिला घेऊन आपल्या घरी गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीचे चार मित्र घरी आले. त्यांनी अल्पवयीन मुलाला घराबाहेर पाठवून पीडित मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचारानंतर मित्र पीडित मुलीला घरी सोडून आला.
या घटनेनंतर रात्री पीडित मुलीची आई कामावरून घरी आली असता, पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर आईनं तातडीने आर्वी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाचही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती देताना आर्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश डेहाणकर यांनी सांगितलं की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्वी पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी तत्काळ रवाना झालं. आख्खं शहर पालथं घालून पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या. यातला एक आरोपी अल्पवयीन आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या घटनेचा अधिक तपास आर्वी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सुचिता मांडवले आणि गणेश खेडकर करत आहेत.
