पारदर्शक आणि निकोप वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी विद्यार्थी, पालकांसह समाजानेही पुढाकार घ्यावा आ. नमिता मुंदडा यांचे आवाहन
पारदर्शक आणि निकोप वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी विद्यार्थी, पालकांसह समाजानेही पुढाकार घ्यावा आ. नमिता मुंदडा यांचे आवाहन
अंबाजोगाई – राज्यातील इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परीक्षा पूर्णतः भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाने परीक्षांचे पारदर्शक व निकोप वातावरण राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांना तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे सामोरे जा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृद्धीचे आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शॉर्टकटचा अवलंब न करता प्रामाणिकतेच्या जोरावर यश मिळवा. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आत्मविश्वास कायम ठेवावा आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन करावे आणि मानसिक तयारी करून द्यावी, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राची शैक्षणिक अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वांनी मिळून शिक्षणाला प्रामाणिकतेच्या आणि न्यायाच्या मार्गाने पुढे नेण्याचा संकल्प करूया. विद्यार्थ्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवावा, शिक्षण संस्थांनी त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे आणि पालकांनी नैतिक शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
*जिल्हा प्रशासनाची परीक्षांसाठी विशेष तयारी*
आगामी परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून कडक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. राज्यातील शिक्षणव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला आणि नैतिकतेला बळ देण्यासाठी शासनाने कॉपी प्रकरणांना पूर्णतः प्रतिबंध घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
