ताज्या घडामोडी

नवनीत काँवत यांच्या कारवाईनंतर निलंबित पोलीस कर्मचारी गायब, पोलीस दलात खळबळ 

नवनीत काँवत यांच्या कारवाईनंतर निलंबित पोलीस कर्मचारी गायब, पोलीस दलात खळबळ 

बीड (प्रतिनिधी)

 नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यां विरोधात धडक कारवाईला सुरुवात केल्या नंतर काही दिवसांपूर्वी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांशी साटेलोटे असल्याच्या आरोपावरून बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता यातील पोलीस हवालदार अशोक हंबर्डे हे गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) प्रवीण कुमार बांगर यांनी आपल्या बदलीसाठी नवनीत काँवत यांना अर्ज दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

     विशेष म्हणजे, बेपत्ता असलेले निलंबित पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे यांना एक दिवस आधीच पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चांगल्या कामासाठी रिवॉर्ड दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निलंबन झाले. ज्या कारवाईसाठी हे निलंबन झाले त्यातील वस्तुस्थिती आणि पोलीस अधीक्षकांना सादर केलेला अहवाल यात तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे.

    वाळूचे ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून दिल्याचा ठपका ठेवत बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना नवनीत काँवत यांनी निलंबित केले होते. मात्र यातील एक कर्मचारी अशोक हंबर्डे हे ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक हंबर्डे यांचा फोनही बंद असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

    एकीकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईचा आदेश असतानाही वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन पोलीस ठाण्यात आणून ठेवले आणि गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी गेवराईतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यांच्यावर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान, दुसरीकडे गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी आपली नियंत्रण कक्षात बदली करावी असा अर्ज पोलीस अधीक्षक काँवत यांना दिला आहे. गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे आणि सहाय्यक फौजदार बलराम सुतार यांच्यावर वाळूच्या पकडलेल्या ट्रॅक्टरवरून कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. शुक्रवारी या दोघांना निलंबित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!