एसबीआय बँकेतून दोन लाखांची रोकड लंपास; नगर परिषदेची रक्कम चोरीला*
*एसबीआय बँकेतून दोन लाखांची रोकड लंपास; नगर परिषदेची रक्कम चोरीला*
अंबाजोगाई – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतून अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर रक्कम अंबाजोगाई नगर परिषदेची होती.
मंगळवारी (दि. ३०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेतील कर्मचारी भिकाजी दामोदर शिंदे चालानची रक्कम बँकेत भरण्यासाठी गेले होते. त्यांनी पैशांची बॅग बँकेतील टेबलावर ठेवली होती. याचवेळी अज्ञात चोरट्याने शिंदे यांची नजर चुकवत बॅग लंपास केली. चोरी झाल्यानंतर शिंदे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
*सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही!*
पोलिसांनी बँकेत येऊन तपास सुरू केला. मात्र, बँकेतील सीसीटीव्हीच्या केबल उंदराने कुरतडल्याने फुटेज मिळू शकले नाही. त्यामुळे चोरट्याचा तपास अधिक कठीण झाला आहे. या घटनेमुळे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना या घटनेबाबत काही माहिती असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
