ताज्या घडामोडी

मस्साजोग मध्ये सलोख्याचं पाऊल, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संतोष देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी निर्माण केला आदर्श 

मस्साजोग मध्ये सलोख्याचं पाऊल, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संतोष देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी निर्माण केला आदर्श 

केज(प्रतिनिधी)

    वंजारा समाजात जन्म घेतलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या शुभ हस्ते 26 जानेवारी प्रजा सत्ताक दिनाचे औचित्य साधून केलेले ध्वजारोहण हे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जातीय  सलोखा प्रस्थापित करण्यासाठी उचललेले पाऊल इतिहास घडवणारे आसून हा आदर्श केवळ गावापुरता नाही, तर जिल्हा,राज्य व संपूर्ण देशात प्रेरणादायी ठरणार आहे.

   संतोष देशमुख हत्ये नंतर मागील काही दिवसा पासून बीड जिल्ह्यासह राज्यात मराठा आणि वंजारी समाजांमध्ये जे अनावश्यक वाद, तेढ निर्माण करण्याचे काम काही शक्ती करत असताना या शक्तीला 26 जानेवारीच्या या प्रसंगाने ठोस उत्तर मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते आज मसाजोग ग्रामपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे काय काय म्हणाले?

सलोख्याचे ऐतिहासिक पाऊल : देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांची आदर्श कृती

   आज मस्साजोग ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबीयांनी सलोखा प्रस्थापित करण्यासाठी उचललेले पाऊल इतिहास घडवणारे आहे. या कृतीमुळे केवळ गावापुरता नाही, तर जिल्हा,राज्य व संपूर्ण देशात प्रेरणादायी संदेश गेला आहे. मराठा आणि वंजारी समाजांमध्ये जे अनावश्यक वाद, तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यांना या घटनेमुळे ठोस उत्तर मिळाले आहे.

आरोपी ज्या जातीचे आहेत, मीही त्याच जातीचा आहे. आरोपी ज्या गावचे आहेत, मीही त्याच गावचा आहे. तरीही, राष्ट्रीय सणाच्या दिवशी मला दिलेला मान आणि सन्मान गावकऱ्यांच्या व्यापक मनोवृत्तीचे प्रतीक आहे. या उपक्रमाचे कौतुक जितके केले जाईल, तेवढे कमीच आहे. स्वर्गीय संतोष अण्णा हे एका जातीपुरते सीमित व्यक्तिमत्त्व नव्हते. ते सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणारे, सामाजिक कार्यासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. अनेकदा वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांच्या गावाला भेट दिली असता, ते स्वतःच्या खुर्चीत मला बसवायचे. अशा कितीतरी आठवणी मनात दाटून आल्या आहेत.

गावामध्ये सध्या पसरलेली शांतता, घराघरांतील मातीत दडलेली आर्त किंकाळी, आणि त्या कोवळ्या लेकरांचे हुंदके, हे सारेच काळीज पिळवटणारे आहे. मानवतेचा अमानुष खून करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांनी दाखवलेल्या संयमाने व सलोख्याने हा दिवस ऐतिहासिक ठरवला ही कृती केवळ गावापुरती मर्यादित न राहता, समाजातील वाद मिटवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!