रेल्वे दुर्घटना आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
रेल्वे दुर्घटना आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगांव (प्रतिनिधी)
मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या मात्र समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने त्यांना चिरडल्याची दुर्देवी घटना घडली.
हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परांडा स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे. या अपघातात आठ ते नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे . मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
बाबा जाधव हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितलं की, परांडा स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झालं आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली. त्यामध्ये अनेकजण बंगळुरू एक्स्प्रेसच्या खाली आले.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
या अपघातात सहा ते आठ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं जळगावचे जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी बचाव पथक पोहोचल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
काय म्हणाल्या खासदार स्मिता वाघ?
या अपघातासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मदत कार्य लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत असं जळगावच्या खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.
