*कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 25 लाखाचे नुकसान, आगीत दुकानातील रेडिमेड कपडे व फर्निचर जळून खाक*
कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 25 लाखाचे नुकसान, आगीत दुकानातील रेडिमेड कपडे व फर्निचर जळून खाक
अंबाजोगाई -: (प्रतिनिधी)
येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असलेल्या नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील कपड्याच्या दुकानाला सोमवारी रात्री अचानक आग लागली व या आगीत दुकानातील रेडिमेड कपडे व फर्निचर जळून खाक झाले. या दुर्घटनेत अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सलग तीन तास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी मारून आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेश प्रभाकर राऊत यांचे आविष्कार मेन्स वेअर हे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे गणेश राऊत हे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले.
रात्री ११.३० वाजता त्यांच्या दुकानातून धुरांचे लोट निघू लागले. हे पाहून रात्रीची पेट्रोलिंग करणारे पोलिस व बाजूच्या चहाच्या टपरीवाल्याने त्यांना फोन वरून ही माहिती दिली. गणेश राऊत यांनी धावत येऊन अग्निशामक दलाला संपर्क केला. मात्र तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत दुकानातील रेडिमेड कपडे, फर्निचर जळून खाक झाले. ही आग इतकी मोठी होती की अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तास पाणी मारण्याचे काम करावे. लागले. या आगीत राऊत यांच्या दुकानातील माल जळून अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा महसूल विभाग, व महावितरण यांच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचे रहस्य पोलीस तपासातूनच उलगडणार आहे.
अर्ध्या रात्रीही अनेकजण मदतीसाठी धावले…

या आगीची माहिती मिळताच
अर्ध्या रात्रीही घटनास्थळी अनेकांनी धाव घेत मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यकर्ते निलेश जगदाळे, कल्याण काळे धनराज सोळंकी, शकील शेख, स्वपिल परदेशी, संतोष मोहिते, प्रवीण चोकडा, गोपाळ परदेशी, पतंगे असे सर्वजण मिळून मदतीसाठी धावून गेले. आग आटोक्यात आणण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांची पहाटे पर्यंत धावपळ सुरूच होती. घटनास्थळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीज पुरवठा खंडित केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
