गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती असून त्याला जात धर्म नसतो, या घटनेच्या आडून एका समाजाला गुन्हेगार ठरवु नका व बीड आणि परळीची बदनामी करू नका ना धनंजय मुंडे यांचे आवाहन
गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती असून त्याला जात धर्म नसतो, या घटनेच्या आडून एका समाजाला गुन्हेगार ठरवु नका व बीड आणि परळीची बदनामी करू नका
ना धनंजय मुंडे यांचे आवाहन
शिर्डी (प्रतिनिधी)
गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात असून बीड आणि परळीची बदनामी करू नका, असे आवाहन ना धनंजय मुंडे यांनी शिर्डी येथील अधिवेशन प्रसंगी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात बोलताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.
या वेळी बोलताना ना मुंडे म्हणाले की, बीडची सध्याची स्थिती पाहून मीच अजितदादांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्री म्हणून आपण जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला, तसा बीडचाही व्हावा. ही माझी भावना आहे”.
बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका
‘विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय, तर करा. मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका”, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली.
आर्थिक हितसंबंधांचे आरोप खोटे
हत्येच्या गुन्ह्याच्या कटातील आरोपी वाल्मिक कराड याच्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि स्थावर मालमत्ता समोर येत आहे. यातून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधत आहेत. त्याबाबत बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, “वाल्मिक कराड याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप खोटे आहेत”
आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही. अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे सांगून परळीची बदनामी थांबवा, असे आवाहन केल्याचे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याची मनात खंत आहे, असेही मुंडें म्हटले.
