ताज्या घडामोडी

तू कॉलर का उडवतो? म्हणत बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संभाजी नगर येथे चाकूने गळा चिरून हत्या

तू कॉलर का उडवतो? म्हणत बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संभाजी नगर येथे चाकूने गळा चिरून हत्या

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)

    छत्रपती संभाजीनगर येथे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रहिवासी असलेल्या बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

   प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) रा.पिंपरखेड ता. वडवणी, जि. बीड असे या विद्यार्थ्याचे नाव असून प्रदीपच्या हत्येमागे महाविद्यालयात झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

    शनिवारी महाविद्यालयातील काही मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादावेळी ‘तू एकटक का पाहतोस?, कॉलर का उडवतोस? अशा कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांतीच्या रात्री प्रदीपचे मित्र बाहेर गेले असताना मारेकऱ्यांनी फ्लॅटमध्ये घुसून त्याची गळा चिरून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता उस्मानपुऱ्यात उघडकीस आली. प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो आपल्या एका मावसभावासह अन्य तीन मित्रांसोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. मंगळवारी सर्वजण महाविद्यालयातून फ्लॅटवर परतले होते. सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते, परंतु प्रदीप मात्र फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता त्याचे भाऊ आणि मित्र परतले, तेव्हा त्यांनी प्रदीपला गळा कापलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत मृत पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक सखोल चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!