*पंतप्रधान नरेंद्रजी मोदींकडून भारतीय संविधानाचा गौरव – सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते*
पंतप्रधान नरेंद्रजी मोदींकडून भारतीय संविधानाचा गौरव – सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते
दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि.12 जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते (दापोली) यांच्या ‘सामाजिक आचारसंहितेची गाथा – संविधान’ या विषयावरील व्याख्यानाने झाला.
कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, राजमाता जिजाऊ माँ साहेब, युगपुरूष स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून भिकुजी दादा इदाते (दापोली), कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभाकरराव साळेगावकर (माजलगाव), सामाजिक कार्यकर्ते विजयराव वाकेकर (परळी वैजनाथ), बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, संचालिका शरयूताई हेबाळकर, इंजि.बिपीन क्षीरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.अशोकराव लोमटे, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, बाळासाहेब देशपांडे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तृतीय पुष्प गुंफताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद यांनी पारतंत्र्यात असलेल्या तत्कालीन समाजात स्फुल्लिंग फुलविले. तर लाल-बाल-पाल यांनी पारतंत्र्यातील भारतात जागृती निर्माण केली. योगी अरविंद, स्वामी दयानंद सरस्वती यांनी देशाच्या एकात्मतेचं चित्र उभे केले. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सवातून समरसतेचा प्रयोग केला. होमरूल लीगच्या माध्यमातून डॉ.ऍनी बेझंट व लोकमान्य टिळकांनी समविचारी मंडळींशी चर्चा करून सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांतून 1895 मध्ये भारतीय संविधानाची 111 कलमं तयार केली. पुढे या सर्व कलमांना ‘स्वराज बील’ असे संबोधले गेले. या कलमांचा समावेश सध्याच्या भारतीय संविधानात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजाराम मोहन रॉय, डॉ.केशव बळीराम हेडगेवार या सर्व महनिय व्यक्तीमत्वांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात भारतीय समाजाच्या उत्थानासाठी विविध सामाजिक आणि विधायक प्रयोग केले. संविधान निर्मिती प्रक्रियेत अतिशय बुद्धिमान, तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या 15 महिलांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यांचे ही महत्वपूर्ण योगदान आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक सर्वसमाज घटकांना न्याय मिळवून देणारे भारतीय संविधान देशाला अर्पण केले. या संविधानात घटनात्मक अधिकार (फंडामेंटल राईट) बहाल करण्यात आले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे कायमच स्मरण ठेवले. तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भारतीय संविधानाला ‘धर्म ग्रंथ’ मानतात. त्यामुळे संविधान, घटना बदलणार असा विरोधकांचा अपप्रचार आहे. हा फेक नरेटिव्ह आहे. असे कदापि ही होणार नाही. आपण भारताचे जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय संविधानाचा लौकिक वाढेल असे साजेसे कार्य करावे, या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींकडून भारतीय संविधानाचा वेळोवेळी गौरव करण्यात येत आहे. याचे दाखले देत, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भ देत दादा इदाते यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. सुमारे 150 वर्षांचा कालखंड उभा केला. यावेळी बोलताना सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभाकरराव साळेगावकर यांनी संविधान हे प्रत्येक भारतीयांच्या जगण्याचा भाग बनले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात जाती अंताची लढाई पुन्हा एकदा लढावी लागेल, प्रत्येकाने संविधानाचे पालन करावे, हक्क आणि कर्तव्य एकत्र नांदले पाहिजेत असे ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा म्हणाले. तर समारोपपर मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी सांगितले की, दीनदयाळ बँक एक परिवार म्हणून आम्ही काम करीत आहोत. उत्तम टीमवर्क करून 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 522 कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण व्यवसायाचा 853 कोटींचा पल्ला ही गाठला आहे. लवकरच 31 मार्च 2025 अखेरपर्यंत 1000 कोटी रूपयांच्या व्यवसायाचे लक्ष्य बँकेने समोर ठेवले आहे. लवकरच ते ही साध्य होईल. आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचे आपण काही देणे लागतो. याच जाणिवेने बॅंकेने मागील 22 वर्षांपासून एक वसा जोपासला आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक स्थिती सुधारावी, खरा इतिहास लोकांसमोर यावा, यासाठी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने कोविड काळासह अव्याहतपणे हे कार्य सुरू ठेवले आहे. या उपक्रमाचे हे 23 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील 66 मान्यवर व्यक्तींनी रसिकांना वैचारिक मेजवानी देवून वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडले आहेत. अशी माहिती अध्यक्ष ऍड.पत्की यांनी दिली. सुरूवातीला पाहुण्यांचा परिचय बँकेचे संचालक ऍड.अशोकराव कुलकर्णी व संचालक प्रा.जयकरण सुरेशकांबळे यांनी करून दिला. सुत्रसंचालन संचालक मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी मानले. आनंदकुमार देशपांडे यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. वंदे मातरम या राष्ट्रगानास 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर यांच्या संपुर्ण वंदे मातरम् च्या गायनाने व्याख्यानमालेचा समारोप झाला. व्याख्यानमालेच्या तीनही दिवस अंबाजोगाईच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, माता, भगिनी, ज्येष्ठ नागरिक, रसिक श्रोते आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
=======================
=======================
