ताज्या घडामोडी

*संघर्षातूनच दिव्यत्व प्राप्त होते – ना.पंकजाताई मुंडे*

संघर्षातूनच दिव्यत्व प्राप्त होते – ना.पंकजाताई मुंडे

_

स्वामी विवेकानंद यांनी भारतीयांचे आत्मभान जागृत केले – प्रा.अभय भंडारी_

दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.अभय भंडारी यांनी ‘स्वामी विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद’ या विषयावर आपले मौलिक चिंतन मांडले. व्याख्यानमालेचे उद्घाटन बँकेच्या संचालिका तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तर यावेळी बँकेचे संस्थापक प्राचार्य राजाभाऊ धाट यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते प्रा.अभय भंडारी, भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे सचिव धनराज सोळंकी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष राजू मोरे आणि दीनदयाळ बँकेचे संचालिका सौ.शरयूताई हेबाळकर, सर्व संचालक श्री इंजि.बिपीन क्षीरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.अशोक लोमटे, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, डॉ.विवेक दंडे, चैनसुख जाजू, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी, महादेव ईटके व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, संघर्षातूनच दिव्यत्व प्राप्त होते. याची प्रचिती स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यातून पुढे येते. आज राष्ट्र महासत्तेकडे वाटचाल करीत असतानाही त्यांचे विचार दिशादर्शक ठरत आहेत. प्रत्येक युगात एक युगपुरूष जन्माला येत असतो. त्याचे विचार हे चिरकाल जगाला मार्गदर्शक ठरत असतात. स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांना कायम प्रेरणादायी ठरणारे आहेत. असे सांगून त्यांनी दीनदयाळ बँक व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ अखंडितपणे राबवित असल्याचे कौतुक ही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.मुंडे यांनी केले. तर प्रथम पुष्प गुंफताना ‘विवेकानंद- आणि भारतीय राष्ट्रवाद’ हा विषय अतिशय समरसतेने गुंफताना प्रा.अभय भंडारी (विटा जि. सातारा) यांनी सांगितले की, स्वामीजींनी भारतीय स्वातंत्र्याचा आणि आर्थिक सबलीकरणाचा पुरस्कार केला. राष्ट्र हेच ईश्वर माना असा मौलिक संदेश दिला. स्वामीजींच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव संबंध जगावर पडला. ज्ञान आणि साधना हे मार्ग स्वामीजींनी दाखवले. त्यांनी आत्मबलाचे महत्त्व पदोपदी विषद केले. 1200 वर्षे गुलामगिरी अनुभवलेला भारतीय समाज मानसिकदृष्ट्या खचला होता. तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी देशभर भ्रमंती करून अस्थिपंजर झालेल्या भारतीयांशी संवाद साधला. त्यांना जाणून घेतले. त्यांचे मनोबल वाढविले. अमेरिकेच्या शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत 7 हजार प्रतिनिधींसमोर हिंदू धर्म व संस्कृतीचे दर्शन घडविले. हिंदू धर्माचे चिंतन मांडले. कर्म सिध्दांत सांगितला. चारित्र्य, राष्ट्रप्रेम यांचा पुरस्कार केला. युवकांनी सत्य आणि निर्भयता आत्मसात करावी असा विचार मांडला. आत्म्याची शुध्दता, पावित्र्य, सकारात्मक विचार, सत्याचा आग्रह धरला. विविध उदाहरणे देत प्रा.भंडारी यांनी तत्कालीन भारतीय जनतेचे आत्मभान जागृत करण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले असे प्रतिपादन केले. प्रा.भंडारी यांनी तपशीलवार, मुद्देसूद, प्रवाही व अभ्यासपूर्ण चिंतन मांडले. त्यामुळे उपस्थित रसिक – श्रोत्यांना प्रा.भंडारी यांचे व्याख्यान मनापासून भावले, आवडले. म्हणून रसिक – श्रोत्यांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय संचालक इंजि.बिपिन क्षीरसागर यांनी करून दिला. सुत्रसंचलन संचालक मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तज्ज्ञ संचालक ऍड.अशोकराव कुलकर्णी यांनी मानले. वैशालीताई विडेकर यांनी पद्य सादर केले. तर संचालिका शरयूताई हेबाळकर यांनी पठन केलेल्या शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक, रसिक श्रोते उपस्थित होते. आयोजित व्याख्यानमालेत शनिवार, दि.11 जानेवारी रोजी प्रकाश पाठक (धुळे) यांचे ‘पंचप्रण’ – सामाजिक परिवर्तनाची गुरूकिल्ली या विषयावर व्याख्यान होईल. बँकेच्या वतीने दि.11 जानेवारी रोजी सहकार भारती स्थापना दिवस ही साजरा करण्यात येईल. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि.12 जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते (दापोली) यांच्या ‘सामाजिक आचारसंहितेची गाथा – संविधान’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. तसेच 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी होईल. अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

=======================

=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!