ताज्या घडामोडी

दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख यांची माहिती
=======================


अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विश्‍वास, विकास आणि विनम्रता या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी व बँकेच्या सर्व सभासदांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून व्याख्यानमालेचा सहकुटूंब, सहपरिवार लाभ घ्यावा असे नम्र आवाहन बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

याबाबत बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख यांनी सांगितले की, दीनदयाळ बँकेने 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत उत्तम टीमवर्क करून 522 कोटी रूपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. तर एकूण व्यवसायाचा 853 कोटींचा पल्ला ही गाठला आहे. लवकरच 31 मार्च 2025 अखेरपर्यंत 1000 कोटी रूपयांच्या व्यवसायाचे लक्ष्य बँकेने समोर ठेवले आहे. लवकरच ते ही साध्य होईल. आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक उत्तरदायित्व व जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. याच जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील 22 वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमाचे हे 23 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत अनेक थोर विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी रसिकांना वैचारिक मेजवानी देवून वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडलेले आहेत. यावर्षी ही युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता (तीनही दिवस) खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, कुत्तर विहिर, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित व्याख्यानमालेसाठी शुक्रवार, दि.10 जानेवारी रोजी प्रा.अभय भंडारी (विटा, जि.सातारा) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘स्वामी विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद’ असा आहे. भंडारी हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत. आजपावेतो त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ही सर्वत्र ओळखले जातात. तसेच शनिवार, दि.11 जानेवारी रोजी प्रकाश पाठक (चार्टर्ड अकौन्टटस, धुळे) यांचे ‘पंचप्रण’ – सामाजिक परिवर्तनाची गुरूकिल्ली या विषयावर व्याख्यान होईल. पाठक हे आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तीमत्व म्हणून ही सर्वदूर ओळखले जातात. ते आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. बँकेच्या वतीने दि.11 जानेवारी रोजी ‘सहकार भारती स्थापना दिवस’ ही साजरा करण्यात येईल. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि.12 जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते (दापोली) यांच्या ‘सामाजिक आचारसंहितेची गाथा – संविधान’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी होईल. अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला – 2025 चा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संचालिका तसेच महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल या विभागाच्या कॅबिनेट मंत्री ना.सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, संचालक श्री.रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, सर्व संचालक श्री.विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, इंजि.बिपीन क्षिरसागर, प्राचार्य किशन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक भिमा ताम्हाणे व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर तसेच सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद यांनी बँकेच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पञकाद्वारे केले आहे.

=======================
=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!