*दिनांक ३ ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बालझुंबड-२०२५ या उपक्रमात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे–राजकिशोर मोदी*
दिनांक ३ ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बालझुंबड-२०२५ या उपक्रमात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे–राजकिशोर मोदी
*रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने बालझुंबड – २०२५ मध्ये अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन*
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ):- प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सलग पंचवीसाव्या बालझुंबडचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ जाने ते ८ जाने २०२५ या दरम्यान बालझुंबडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते.तेव्हा अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी , सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी व संचालक संकेत मोदी यांनी केले आहे .
मागील २४ वर्षापासून प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने बालझुंबड हा उपक्रम अंबाजोगाई शहरात अखंडीतपणे राबविण्यात येत आहे. यंदाचे वर्ष हे बालझुंबड या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. प्रतिवर्षी तालुक्यातील सर्व शाळां या उपक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असतात. याही वर्षी तालुक्यातील सर्व शाळा यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली आहे .
बालझुंबड हा उपक्रम तालुकास्तरावर आयोजीत केला जात असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते नियोजन देखील त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. या उपक्रमातुन अंबाजोगाई तालुक्यातील विविध शालेय विद्यार्थ्याच्या कलागुणांना यातून संधी प्राप्त होत आहे. क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या तयारीत असून हा उपक्रम अतिशय शिस्तबध्द व नियोजन बद्ध पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षामुळे यंदा स्पर्धेचे वैशिष्टयपुर्ण नियोजन करुन तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.
बालझुंबड-२०२५ या उपक्रमांतर्गत इ.१ ली ते ४ थी गटासाठी रंगभरण स्पर्धा, वैयक्तीक नृत्य, समुह नृत्य, इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यासाठी पी.पी.टी. स्पर्धा (PPT Competation), प्रश्नमंजुषा स्पर्धा (Quiz Competation), चित्रकला, वैयक्तीक नृत्य, समुहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी बालझुंबड हे खुले व्यासपीठ आहे. अंबाजोगाई तालुक्यातील जवळपास ७० ते ८० शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळांच्या माध्यमातून सहभागी होतात. बालझुंबडच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणी कलावंत तयार झाले असून ते नाटक, सिनेमा तसेच क्रीडाविश्वाच्या माध्यमातून विविध खेळाडू व कलांच्याद्वारे आपल्या छाप अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पाडत आहेत. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होत नाही अशा शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड ही केवळ एक स्पर्धा नसून एक पर्वणीच ठरल्या जात आहे. बालझुंबड हा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक स्नेह मेळावा, स्नेह संमेलन तथा आनंदोत्सवच ठरतो. यामध्ये सर्व स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. तेव्हा सर्व स्पर्धकांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा संयोजक यांचेशी संपर्क साधुन तात्काळ आपला प्रवेश नोंदवावा.
स्पर्धेच्या अधिक माहिती व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी समन्वयक, बालझुंबड- २०२५, जोधाप्रसादजी माध्यमिक विद्यालय गुरुवारपेठ, अंबाजोगाई येथे संपर्क साधावा व अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी, संचालक संकेत मोदी तसेच समन्वयक राजेश कांबळे, मुख्याध्यापक आनंद टाकळकर , विनायक मुंजे संपर्क क्र.९८६०३३७००८/९८५०५९१०६१ /९४२१३४१६८८) यांनी केले आहे. बालझुंबड-२०२५ हा कार्यक्रम न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, विलासराव देशमुख सभागृह तसेच मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
