*13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून प्रशासनाला लावला 21 कोटी 59 लाख 38 रुपयांचा चुना*
13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून प्रशासनाला लावला 21 कोटी 59 लाख 38
रुपयांचा चुना
संभाजीनगर :
13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख 38 रुपयांचा चुना लावल्याचे निदर्शनास आले आहे.
कमी काळात वाममार्गानं अमाप काळा पैसा आला की भलेभले बिथरतात. दौलत जादा करत सुटतात. तेलगीनं एका रात्रीत बारबालेवर लाखो रुपये उडवले आणि तेलगी घोटाळा उघडकीस आला. असंच काहीसं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलंय. एका दिवट्याची दौलतजादा त्याचं बिंग फुटण्यासाठी कारणीभूत ठरली. कुपणानंच शेत खाल्लं ही म्हण तुम्ही ऐकली असेल. इथं अगदी तसंच घडलंय. कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरनं सरकारला एक दोन नव्हे तर तब्बल 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या सगळ्या घोटाळ्याचं बिंग फुटल्यानंतर आरोपींची दौलतजादा उजेडात आली.
मैत्रीला 4 बीएचके फ्लॅट अन् 35 लाखांची BMW कार
13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती. तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयुव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचे नाव असून, तो एसयुव्ही कार घेऊन फरार झाला आहे.
बँकेतून 21 कोटी असे केले गायब
क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आलं होतं. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बीके जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे, विभागीय उपसंचालकाच्या 6 महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
कसा केला हर्षल क्षीरसागरने घोटाळा
क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटी आले.
बुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला होता. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळते केले. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.
विभागीय क्रीडा संकुल प्रशासन झोपले होत की काय?
कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करीत असताना क्रीडा उपसंचालक, बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले, असा प्रश्न आहे. आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. डल्ला मारलेल्या या पैशांमध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार शिरसागर याने आपल्या मैत्रिणीला आलिशान फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट केला, डायमंडचा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली. 13 हजार पगार असणाऱ्या या आरोपीने महागड्या गाड्या, महागडे फ्लॅट्स आणि डायमंडचा चष्मा वापरला हे जितकं आश्चर्यकारक आहेत तितकंच या संपूर्ण प्रकाराचे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासनाला कल्पना सुद्धा कशी लागली नाही हा मोठा प्रश्न आहे.
