विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक पावले उचलली
विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक पावले उचलली
शहरात जमाव बंदी आदेश लागू त्या समाज कंटकाला जमावा कडून चोप, पोलिसांनी घेतले ताब्यात
परभणी :-(प्रतिनिधी)
नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक पावले उचलली असून शहरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत दरम्यान या घटनेतील समाज कंटकाला जमावाने चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काल परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाज कंटकांनी विटंबना केल्या नंतर या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे कालच रास्ता रोको, रेल रोको व किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले होते. आज पुन्हा परभणी बंदची हाक देण्यात आली होती. शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. या प्रसंगी रस्त्यावर उतरलेल्या महिला व पुरुष अनुयायांनी दुकानावर दगडफेक व जाळपोळ सुरू केली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव एवढा संतप्त होता की, जमावाने पोलिसांवर ही दगडफेक सुरू केली, पोलीस व्हॅनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी ही सर्व प्रथम लाठीचार्ज आणि त्या नंतर अश्रूधुरांचा वापर करून जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केला.
जमाव एवढ्यावर ही थांबला नाही त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आतील फर्निचरची मोडतोड केली.
शहाजी उमाप यांनी कठोर पावले उचलली
घटनेचे गांभीर्य व परस्थिती ओळखुन नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तात्काळ परभणी गाठली आणि येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला सक्त आदेश करत कडक पावले उचलली. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशा नुसार शहरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेतील समाज कंटकाला जमावाने चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
