स्वा रा ती रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा प्रकरणी चौकशी समिती स्थापन, रुग्ण व नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही- अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांचा रुग्ण व नातेवाईकांना दिलासा
स्वा रा ती रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा प्रकरणी चौकशी समिती स्थापन, रुग्ण व नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही- अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांचा रुग्ण व नातेवाईकांना दिलासा
अहवाल प्राप्त होताच त्या गोळ्यांचा वापर त्याच वेळी थांबवण्यात आला आसून गुन्ह्यातील एजन्सीचे बिले थांबवण्यात आली
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अन्न व औषध प्रशासनाने ऑगस्ट 23 मध्ये तपासणी साठी घेतलेल्या गोळ्यांचा अहवाल ऑक्टोबर 24 मध्ये प्राप्त झाला असून गोळ्यांचा वापर त्याच वेळी थांबवण्यात आला आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील एजन्सीचे बिले थांबवण्यात आली असून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असा दिलासा व विश्वास स्वा रा ती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी दिला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधीचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाल्या नंतर या प्रकरणी अन्न व भेसळचे औषध निरिक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी (रा. भिवंडी, जि.ठाणे),द्विती सुमित त्रिवेदी (रा. सुरत) आणि विजय शैलेद्र चौधरी (रा. मिरा रोड ठाणे) या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेजोगाई पोलीस अधिकचा तपास करत आहेत. हे वृत्त बाहेर आल्यावर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांच्याशी संपर्क केला असता मिळालेली माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ई-टेंडरद्वारे कोल्हापूरच्या विशाल इंटरप्रायजेस या एजन्सीकडून अॅझिमसीम ५००० व अॅझिथ्रोमायसिनची गोळी सह अन्य काही औषधे पुरवठा करण्यात येत होती. १० ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी रुटिंग नमुने तपासणीसाठी घेतले होते. यात याही गोळ्या होत्या. मुंबईच्या प्रयोगशाळे कडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी मिळाला आणि अन्न व औषध प्रशासन निरिक्षक मनोज पैठणे यांनी आता डिसेंम्बरच्या सुरवातीला सदर औषध पुरवठा धारकावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
ई-टेंडरिंगद्वारे २५ हजार ९०० गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, २९ जुलै २०२३ रोजी केला होता. या एजन्सीकडे विचारणा केली असता, त्यांनी भिवंडी येथील अॅक्वेटिस बायोटेक एजन्सी व गुजरातमधील डिंडोली येथील मार्फासिक्स बायोटेक या दोन कंपन्यांकडून, २३ लाख १०० गोळ्यांची खरेदी केल्याची माहिती दिली. औषध विभागाने या दोन्ही कंपन्यांकडे माहिती मागितली, असता मार्फासिक्स बायोटेक या एजन्सीने, भिवंडीच्या अॅक्वेटिस एजन्सीकडून गोळ्यांची खरेदी केल्याचे सांगितले. तर, अॅक्वेटिस एजन्सीचे मिहिर त्रिवेदी यांनी ठाण्याच्या काबीज जेनरिक हाऊस या कंपनीकडून ५० लाख ५५ हजार गोळ्या खरेदी केल्याचे सांगितले. दरम्यान ज्या विशाल इंटरप्रायजेस कंपनीवर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या विशाल इंटरप्रायजेस ने या पूर्वीच ज्यांच्या कडून या गोळ्या खरेदी केल्या होत्या त्या भिवंडी येथील कंपनी विरोधात राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ एफडीएलाही कळवले आसून या कंपनी कडून औषधी घेणे बंद केलेले आहे शिवाय घेण्यात आलेल्या औषधाचे बिल देखील थांबवण्यात आले असून या साठी एक चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली आसून चौकशी सुरू आहे त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असा विश्वास अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी रुग्णांना दिला आहे.
