*संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे – मनोज जरांगे*
*संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे – मनोज जरांगे*
*केजमध्ये तणाव कायम; आंदोलकांनी बस पेटवली अद्याप रास्ता रोको सुरूच*

केज – (प्रतिनिधी)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आजूनही केज व मस्साजोग या ठिकाणी रस्ता रोको सुरू असून जो पर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी घेतला असून या हत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी या वेळी केली.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याने मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी केज येथे अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावर मस्साजोग व केज या ठिकाणी आज सकाळ पासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास या रास्ता आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले होते.
अजून ही रस्ता रोको सुरूच असून जो पर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी घेतला असून या हत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोग गाव गाठत आंदोलन स्थळी भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिसांशी फोनवरून संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, मस्साजोग गावच्या सरपंचाच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्याला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. सुजाण आणि चांगल्या जनतेला वेठीस धरण्याचे, त्रास देण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
*मस्साजोग मध्ये आज चूल पेटली नाही*
संतोष देशमुख यांच्या हत्येने मस्साजोग सह केजच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्व गावच रस्त्यावर असल्याने या दुःखद घटने मुळे कोणाच्याही घरात आज चूल पेटली नाही.
