केज

*संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास जलदगतीने करून आरोपींना कठोर शासन करा* *आ. नमिता मुंदडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास जलदगतीने करून आरोपींना कठोर शासन करा*

*आ. नमिता मुंदडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

 

अंबाजोगाई – केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावे आणि या प्रकरणाची पाळेमुळे शोधून आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी अपहरण करून नंतर निर्घुण खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत. संतोष पंडितराव देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते, सदर घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर खून प्रकरणाचा तपास जलदगतीने करून प्रकरणाच्या मुळाशी जावून सर्व संबंधित आरोपींना अटक करून कठोर शासन करणे अत्यंत गरजेचे आहे असे आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, आ. मुंदडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासोबत चर्चा केली असून तातडीने आरोपींचा शोध घ्यावा अशा सूचना केल्या आहेत. केज सारख्या अतिशय सहिष्णू आणि शांत मतदार संघात अशी अमानुष घटना निंदनीय असून या प्रकरणाच्या बारकाईने तपासाबाबत स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही आ. मुंदडा यांनी सांगितले.

*संवेदनशील व्यक्तिमत्व गमावले*
मस्साजोग ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संतोष देशमुख हे सतत पुढाकार घेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रयत्नपूर्वक गावाच्या विकासात योगदान दिले. अतिशय शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्व अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने एक संवेदनशील व्यक्तिमत्व गमावले आहे अशा शब्दात आ. नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!