माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा रा कॉ शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल*
=======================
केज (प्रतिनिधी)
कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
२३२ केज विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या अंजलीताई घाडगे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख, संजीवनीताई देशमुख, सुरैय्या भाभी, सौ.जयश्री साठे, सौरभ सोनवणे, रघुनाथ कुचेकर हे प्रमुख नेते उपस्थित होते. केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी कुठले ही शक्तिप्रदर्शन केले नाही, तर अतिशय साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळेस पृथ्वीराज साठे यांच्या नांवाची केज मतदारसंघात जोरदार चर्चा पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीची ताकद व मागील दहा वर्षांत माजी आमदार साठे यांनी ठेवलेला जनसंपर्क व या निवडणुकीत त्यांनी निर्माण केलेला हा माहोल जर शेवटपर्यंत कायम टिकून ठेवण्यात त्यांना यश आले. तर मग या निवडणुकीत माजी आमदार साठे यांचाच विजय होणार अशा प्रतिक्रिया जनतेतून ऐकायला येत आहेत. माजी आमदार साठे यांना भरभरून मिळत असलेला प्रतिसाद पाहून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जनतेत त्यांची लोकप्रियता कायम असल्याचेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
======================
=======================
