केजवासीयांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद – आ. नमिता मुंदडा केज येथे सांस्कृतिक सभागृहाच्या पायाभरणी, क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
केजवासीयांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद – आ. नमिता मुंदडा
केज येथे सांस्कृतिक सभागृहाच्या पायाभरणी, क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
केज (प्रतिनिधी) :- केज शहरात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह व तालुका क्रीडा संकुल उभारणीतून केजवासीयांचे स्वप्न होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. हे सभागृह ६०० आसन क्षमतेचे सर्व सोयी – सुविधांचे होत असल्याने कलाप्रेमींना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तर क्रीडा संकुलात विविध खेळांच्या मैदानाचे नियोजन करण्यात आल्याने ग्रामीण खेळाडूंना घडण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन आ. नमिता मुंदडा यांनी केले.
केज शहरातील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक सभागृहाची पायाभरणी व तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभेचे प्रभारी झारखंडचे आ. श्रवण रनखांब, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सुनील गलांडे, नेताजी शिंदे, दिलीप भिसे, शंकर उबाळे, वसंत केदार, डॉ. वसुदेव नेहरकर, महादेव सूर्यवंशी, भगवान केदार, महादु मस्के, मुरली ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की, महायुतीचे सरकार आल्यानंतर माजी मंत्री आ. पंकजा मुंडे व माजी खा. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघातील विविध विकास कामासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगून केज शहरातील रस्त्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी दिला असून दोन गार्डनसाठी प्रत्येकी १८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. भवानी माता मंदिर व दर्ग्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगून या सर्व विकास कामातून केजचा चेहरा बदलणार असल्याचे त्या म्हणाल्या.
————
गायरान जमिनीतील घरांना धक्का बसणार नाही
———-
पिसेगाव येथील गायरान जमिनीत तालुका क्रीडा संकुलाचे काम होत असून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांनी आमची पर्यायी व्यवस्था करून घरकुल बांधून द्यावीत अशी मागणी भूमिपूजन प्रसंगी केली. यावेळी पर्यायी जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्यात येईल. तोपर्यंत बांधलेल्या घरांना धक्का लावला जाणार नाही. अशी ग्वाही आ. नमिता मुंदडा व तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली.
—————————————
यावेळी बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले कि ; स्व विमलताईंनी मतदार संघात काम करत असताना कधीही जात बघितली नाही त्यांच्या विचारांचा हाच वारसा आम्ही पुढी चालवत आहोत . मतदार संघात विकासाचे एकही काम न आणणारे आमच्या काळात विकास झाला नाही असे म्हणतात अशी उपरोधिक टीका कोणाचेही नाव न घेता करत विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खुल्या मंचावर समोरासमोर यावे असे आव्हान विरोधकांना त्यांनी दिले . तसेच राजकारणात पन्नास मार्क हे विकासाला , पंचेवीस मार्क चारित्र्याला तर उर्वरित पंचेवीस मार्क सुख – दुःखात सामील होण्याला असतात तरच शंभर मार्कांची बेरीज करून यश मिळवता येते असे सांगत काहींचे कान देखील त्यांनी टोचले . तसेच मतदार संघातील प्रत्येक गावात विकासाची कामे झाली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले . तसेच केज शहरासाठी शंभर कोटींची नळयोजना देखील मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याची माहिती सांगत विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ वसुदेव नेहरकर यांनी केले तर प्रास्ताविक महादेव सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमास शहर व तालुक्यातील कलावंत व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
