अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी बोगस औषध पुरवठा प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा – राजेभाऊ फड
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी बोगस औषध पुरवठा प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा – राजेभाऊ फड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जवळपास तीन जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी जीवनदायी रुग्णालय आहे. दररोज हजारो रुग्णांवर येथे उपचार होतात. याच रुग्णालयात बोगस औषधाचा पुरवठा सुरू असल्याची बाब नुकतीच उघड झाली. याबाबत पोलिसांत गुन्हाही नोंद झालेला आहे. मात्र एवढ्यावर हे प्रकरण न थांबवता त्याच्या मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील प्रकरण हे गंभीर असून याची पाळेमुळे राज्यात इतर ठिकाणीही असू शकतात. प्रशासकीय यंत्रणेतील अनेक बड्या लोकांचे यात हात असण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी केली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा होत असल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. शासनाने नेमून दिलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले. याबाबत अंबाजोगाई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील बोगस औषध पुरवठा प्रकरणात गुजरात आणि ठाणे जिल्ह्याचे कनेक्शन असून ही टोळी राज्यात आणि आंतरराज्य सक्रिय असण्याची दाट शक्यता आहे. गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे परवडत नाही, त्यांच्यासाठी हे शासकीय रुग्णालये वरदान ठरतात. तिथे असे प्रकार उघडकीस होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासकीय यंत्रणेत अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार ही नक्कीच हादरविणारी बाब असून, यातील सर्व दोषींची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी केली आहे.
उच्चस्तरीय चौकशी करा
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बोगस औषधांचा पुरवठा होणे ही गंभीर आणि निंदनीय बाब आहे. या गैरप्रकारात अनेकांचा हात असण्याची शक्यता आहे. सदरील शासकीय औषध पुरवठा कंत्राटदाराला कुणाच्या शिफारशी नुसार कंत्राट देण्यात आले? कोणत्या मंत्र्याचा? कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा यात सहभाग आहे? हा कंत्राटदार कुठून औषध उपलब्ध करत होता? कोणत्या कंपन्यांशी त्याचे हितसंबंध आहेत? जिल्ह्यातील कोणते शासकीय अधिकारी यात सहभागी आहेत? याची निःपक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी एसआयटी पथक नेमून या प्रकरणाचे पाळेमुळे शोधावेत व दोषींना शिक्षा करावी अशी मागणी राजेभाऊ फड यांनी केली आहे.
Post Views: 146