योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर च्या पुढाकाराने आयोजित मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबिरात 1600 रुग्णांची मोफत तपासणी
योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर च्या पुढाकाराने आयोजित मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबिरात 1600 रुग्णांची मोफत तपासणी

अंबाजोगाई -: (प्रतिनिधी )
येथील योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबिरात 1600 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, या वेळी रुग्णांना मोफत औषध पुरवठाही करण्यात आला.
मागील 12 वर्षा पासून येथील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे हे
समाजात वाढणारा मधुमेहाचा आजार
रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवत असून मधुमेही साठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करत आहेत.
या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास उद्घाटक म्हणून आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आयएमए चे अंबाजोगाई अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. राजेश इंगोले, डॉ. सुलभा पाटील, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, संयोजक डॉ अतुल शिंदे, डॉ. स्वाती शिंदे यांची उपस्थिती होती.

या वेळी डॉ अतुल शिंदे यांनी मधमेह रोखण्यासाठी व युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक महिन्यात मोफत रक्त तपासणी शिबिर सुरू असल्याचे सांगितले. मधुमेह कसा रोखता येईल? यासाठी त्यांनी अनेक उपाय सांगून जीवन जगताना आहार, व्यायाम व तणावमुक्त जीवन जगण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलताना गणपत व्यास म्हणाले की डॉ. अतुल शिंदे हे सेवाभाव जोपासून आरोग्य सेवा देतात. समाजाशी असलेली बांधिलकी त्यांनी जोपासली म्हणूनच आज अनेकजण मधुमेहाच्या दुष्परिणामा पासून दूर आहेत. यावेळी डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. नवनाथ घुगे, डॉ श्रीनिवास रेड्डी, डॉ सुलभा पाटील, डॉ. राजेश इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या शिबिरास मधुमेही रुग्णांनी एवढा प्रतिसाद दिला की डॉ अतुल शिंदे यांनी १६०० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार केले आणि विविध फार्मसिटीकल कंपनीच्या वतीने पुरवण्यात आलेल्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
या शिबिरात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, आयएमए, अॅम्म्पा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन विनायक मुंजे व आभार प्रदर्शन धनराज सोळंकी यांनी मानले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध फर्मासिटीकल कंपनीच्या प्रतिनिधीसह संतोष देशपांडे, गोविंद पांचाळ, विनोद स्वामी, अजित स्वामी, रणजित मंगे, संकेत माले, माधवी सरवदे, सारिका जाधव, सत्यभामा स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.
