साथीचे आजार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी गरजेची
राज्याला पावसाने चांगलेच झोडपल्याने राज्यात सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारख्या साथीच्या आजाराने राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. साथीच्या आजाराने रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकणगुणियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे विशेषतः राज्यातील महापालिका क्षेत्रात मुंबई मध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे, गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया आणि कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात देखील डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. पुण्यातही जवळपास तीच परिस्थिती आहे त्यामुळे आरोग्य खाते अलर्ट मोडवर आले आहे. मागील काही दिवसांपासून विशेषतः पावसाला सुरवात झाल्यापासून साथीच्या आजाराने डोके वर काढायला सुरवात झाली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासोबतच सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, शिंका येणे यानेही नागरिक त्रस्त झाले आहेत. चार वर्षांपूर्वी राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडवला होता. कोरोना देखील संसर्गजन्य रोग होता त्यातून आपण आता कोठे सावरलो आहोत तोच आता या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे अर्थात हे साथीचे आजार कोरोना इतके धोकेदायक नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक ठरू शकते म्हणूनच आरोग्य खात्याने ही साथ मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे. ही साथ अधिक वाढू नये म्हणून आरोग्य खाते सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. आरोग्यखाते त्यांची जबाबदारी पार पाडतच आहे पण आरोग्य खात्यासोबतच नागरिकांनी आणि प्रशासनाने देखील ही साथ आणखी वाढू नये यासाठी याबाबत काळजी घ्यायला हवी. वास्तविक दरवर्षी पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार पसरतात पण ते पसरू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच खबरदारी घेतली जात नाही. या साथीबाबत नगरपालिका असो की महानगरपालिका उदासीनच दिसून येते. दरवर्षी कचऱ्याचे ढीग, घाणीचे साम्राज्य, सांडपाण्याचे डबके यांचे वेळीच सर्वेक्षण केले जात नाही. त्यामुळे शहरात जागोजागी असलेले कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचे डबके, आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. याची वेळीच विल्हेवाट लावली गेली असती तर आज ही वेळ आली नसती. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारखे साथीचे आजार हे डासांमुळे होतात. ज्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य असते अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. शहरातील हे घाणीचे साम्राज्य कमी झाले की डासांचे प्रमाणही कमी होईल. प्रशासनाने शहरातील घाणीचे साम्राज्य कमी करण्यासाठी तसेच शहरात कचऱ्याचे ढीग पसरू नयेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. तसेच शहरात सर्वत्र औषध फवारणी करावी. डेंग्यूला कारणीभूत ठरणारा एडिस इजिप्ती हा डास गोड्या पाण्यात राहतो. डेंग्यूचे डास पसरू नयेत यासाठी नागरिकांनीही काळजी घ्यावी. नागरिकांना आपल्या घराच्या परिसरात, छतावर, भांड्यामध्ये, जुन्या वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या घराचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा. याशिवाय नागरिकांनी सकस आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, ज्यूस पिणे, नियमित व्यायाम करणे, अराम करणे, पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. कोणताही आजार किरकोळ आजार आहे असे समजून अंगावर काढणे धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेपासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत विशेष काळजी घ्यावी. सरकारने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाद्वारे याबाबत जनजागृती करावी. शाळा महाविद्यालयातही याबाबतीत प्रबोधन करावे. वैयक्तिक, सामूहिक व शासकीय पातळीवर व्यापक प्रयत्न करूनच साथीच्या आजाराशी दोन हात करता येईल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२२५४६२९५
