*परभणी येथील पोलिसी अत्याचाराच्या विरोधात धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समितीचे अंबाजोगाईत जेलभरो आंदोलन*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
परभणी येथील पोलिसी अत्याचाराच्या विरोधात धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने गुरूवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना संदर्भीय विषयाला अनुषंगून एक निवेदन देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते महादेव आदमाने, भिमराव सरवदे, अशोक पालके, धीमंत राष्ट्रपाल, विनोद शिंदे, राजेश वाव्हुळे, अक्षय भुंबे, मंजुषाताई कसबे, दशरथ सोनवणे, विश्वजीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी जेलभरो आंदोलनाचे संयोजन केले. आंदोलकांनी महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान, विजयदादा वाकोडे व शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या प्रतिमा, फलक व निळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करून परभणी येथील पोलिसी अत्याचाराचा निषेध नोंदविला. प्रारंभी महादेव आदमाने, भिमराव सरवदे, अशोक पालके, धीमंत राष्ट्रपाल, राजेश वाव्हुळे, अक्षय भुंबे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. नेतृत्व करणाऱ्या याच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर इतर सर्व आंदोलक ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्यासह निषेधाच्या घोषणा देत स्वतःहून चालत पोलिस ठाण्यात उपस्थित झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दलित आदीवासी व अल्पसंख्याकांना किडामुंगी सारखे रगडण्याची सत्ताधारी यांची जातीय मानसिकता आहे. त्याचा आम्ही धिक्कार करतो. शहिद सोमनाथ सुर्यवंशीचे मारेकरी पोलिस व अधिकारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्या आई-वडिलांना नगदी पन्नास लाख रूपये देवून त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नौकरीत सामावून घ्या अशी मागणी करीत आहोत. परभणीत इतके अत्याचार होतांना पॅंथर विजयदादा वाकोडे यांना सलग सहा दिवस कसलाही आराम नव्हता, ना झोप, ना वेळेवर जेवण, ना औषधपाणी ते सतत दलितांच्या वस्तीत लोकांना धिर देत फिरत होते व पोलिस व प्रशासनाशी झगडत होते. परिणामी सोमनाथच्या अत्यंविधी नंतर त्यांना मृत्यूने गाठले आणि परभणीच्या गोरगरीबांचा कायमचा आधार पोलिस आणि प्रशासनाने हिरावून घेतला. या सर्व परभणीच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशा मार्फत चौकशी करा, पीआय अशोक काळबांड याला निलंबीत करा व त्याला आरोपी बनवून कोठडीत टाका, जखमी स्त्री-पुरूषांना प्रत्येकी दहा लाख रूपये नुकसान भरपाई द्या, विनाकारण तरूण मुली व वृध्द महिलांची धरपकड झाली व बेछुटपणाने मारहाण झाली. त्याचा मावेजा म्हणून सरकारने प्रत्येकी पंधरा लाख रूपये मावेजा देण्याची आमची मागणी आहे. शिक्षण घेणाऱ्या तरूणांना कोम्बींगमधून घरातुन उचलून आणले अशा विद्यार्थ्यांना पाच लाख रूपये नुकसान भरपाई द्या. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तर तथाकथीत हिंदु रक्षण समितीचा मोर्चा परभणीत झाल्याच्या दोन तासांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील घटना शिल्पाची मोडतोड होते, हा काही योगायोग नाही तर वैचारीक शत्रुच्या छावणीत आंबेडकरी विचार त्यांची प्रतिके याविरूध्द कायम षडयंत्र चालु आहे. तडीपार अमित शाह यानेही संसदेत डॉ.बाबासाहेबांच्या बद्दल गरळ ओकून भाजपा व संघाचा खरा चेहरा दाखविला आहे. एकेकाळी न्यायालयाचा गुन्हेगार असलेला माणूस इतका सफाईदारपणे या देशात भेदभाव आणि धार्मिक ध्रुविकरण या आधारे संविधानाचा आधार वेवून उच्च अशा संवैधानिक राजकीय पदावर गेला व देशाच्या सामाजिक न्याय, स्त्री स्वातंत्र, दलित आदिवासी आणि तमाम जाती धार्मातील माणूसकी नाकारलेल्या समाजाचे जे मानबिंदु आहेत. त्यांच्याबद्दल लोकसभेत गरळ ओकतो त्या अमित शाहचा आम्ही तीव्र धिक्कार करतो. या सर्व परिस्थितीत परभणीत जी अमानुषता घडविली गेली त्या विरोधात आम्ही निषेध म्हणून स्वतःच जेल भरो करीत आहोत. असे नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर निवेदक कॉ.बब्रुबाहन पोटभरे, महादेव आदमाने, भिमराव सरवदे, अशोक पालके, विनोद शिंदे, धीमंत राष्ट्रपाल, राजेश वाव्हुळे, अक्षय भुंबे, विश्वजीत शिंदे, सुशिल गायकवाड, सचिन गालफाडे, दिपक गुंजाळ, हमीद चौधरी, दशरथ सोनवणे, बापु गोमसाळे, दत्ता काटे, राम वाघमारे, अशोक काळे, मुन्ना वेडे, विशाल शेवाळे, प्रमोद दासूद, बाबा शेख, राहुल गंडले, अमर वाघमारे, अशोक ढवारे, प्रितम वाघमारे, विजय कांबळे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर यावेळी मदनलाल परदेशी, कल्याण भिसे, सुधाकर देशमुख, विशाल पोटभरे, अनिता पाडुळे, सौ.लोंढे यांच्यासह धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*दलित, श्रमिक व आदिवासींची एकजूट करून संघ आणि भाजपाचा पाडाव करू :*
सनातनी कॉर्पोरेट सत्ता भारतात आणि महाराष्ट्र राज्यात आल्यापासून दलित अदिवासी आणि अल्पसंख्यांक यांना लक्ष करून पोलिसांमार्फत याची दडपशाही केली जातेय, कधी जंतर मंतरवर संविधान जाळले जाते तर कधी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केली जाते. याचा प्रतिकार करणाऱ्या दलित जनतेला मरेपर्यंत मारझोड करणे त्याचे वस्तीत रात्री आपरात्री पोलिस कोम्बींग ऑपरेशन करतांना बाळंतीण तरूणी, शिकत असलेल्या मुली, तरूण आणि वृध्द सर्वांवर बेछुट असा लाठी हल्ला, पोलिसांकडून होतो. परभणीत अशाच अमानुष हल्ल्यात सर्व वस्त्यांतील सर्व वयोगटातील स्त्री, पुरूषांना लक्ष करून अमानुष अशी मारझोड केली, महिलांची, तरूणांची हाडे मोडली, बाळांतीण तरूणींना ही सोडले नाही, रस्त्यातील वाहने दुचाकी, तीन चाकी, चार चाकी यावर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमा असतांनाही तोडफोड केली. सुर्यवंशी या तरूणास जी मारहाण झाली ती त्याचा जीव घेण्यासाठीच झालेली होती व त्यातच त्याचा जीव घेतला गेला. जेव्हा-जेव्हा डॉ.बाबासाहेबांची कोणी प्रतिमा विद्रुप करते किंवा तोडफोड करते तेंव्हा देशभर त्या आरोपीला माथेफिरू म्हणण्याची पोलिसांची व सत्ताधारी वर्गाची थिअरी पुढे आणली जाते. माथेफिरू नेमका शोधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचीच का विटंबना करतो..? म्हणजे त्या आरोपीला सारासार विचार करण्याची बुध्दी असते. पण, पोलिस आणि सत्ता असली बिनडोक थिअरी सांगुन त्या विटंबनेत सामील असतात. परभणीत पोलिसांनी सलग साठ तास दलितांच्या वस्त्यात नंगा नाच करून पोलिसांत दडलेला दलित द्वेष प्रगट करून मानवतेला काळीमा लागेल इतके अत्याचार केले. त्यामुळे आगामी काळात दलित, श्रमिक व आदिवासींची एकजूट करून संघ आणि भाजपाचा पाडाव करू.
*- कॉ.बब्रुवाहन पोटभरे*
(धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी प्रतिकार समिती, अंबाजोगाई.)
=======================
=======================
