अंबाजोगाईकरांनो गावचे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा__ज्येष्ठ पत्रकार लेखक अमर हबीब यांचे नम्रतापूर्वक आवाहन
अंबाजोगाईकरांनो गावचे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा__ज्येष्ठ पत्रकार लेखक अमर हबीब यांचे नम्रतापूर्वक आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
१४ आणि १५ डिसेंबर रोजी ११ वे आंबाजोगाई साहित्य संमेलन आद्यकवी मुकुंदराज सभागृहात होत आहे. हे तुम्हाला माहीत आहे.
तुम्हाला हेही माहीत आहे की, हे संमेलन लोकाश्रयी आहे. २०० रुपये भरून जे लोक स्वागत सभासद होतात, त्यांच्या पैश्यातून हे संमेलन घेतले जाते. आपल्या गावात असे अनेक धनवान लोक आहेत, जे असे संमेलन चुटकी सरशी घेऊ शकतात. त्यांच्या पुढे हात पसरला तर ते नाही म्हणणार नाहीत. पण साहित्याचे संमेलन घ्यायचे तर ते स्वाभिमानाने घ्यावे, कोणापुढे हात पसरू नये हा आमचा ठाम निर्धार आहे.
संमेलन हा एक इव्हेंट नाही, साहित्याची मूव्हमेंट आहे. ती जिवंत राहायची असेल तर ती लोकाश्रयानेच चालली पाहिजे. मला तुमच्या पुढे हात पसरण्यात अजिबात संकोच वाटत नाही. मात्र धनवानांपुढे हात पसरण्याची माझ्यावर वेळ येऊ नये असे मला मनापासून वाटते. दुर्दैवाने तशी वेळ आली तर मी हे काम सोडून देणे पसंत करेन!
अंबाजोगाईची लोक संख्या आज लाखाच्या वर आहे. ३० ते ४० हजार कुटुंबे या गावात राहतात. त्यातली १० हजार कुटुंबे पैसे देऊ शकत नाहीत म्हणून सोडून दिली तरी २० ते ३० हजार कुटुंबे मध्यमवर्गीय आहेत. साहित्य चळवळीला दोन वर्षातून एकदा दोन शे रुपये देणे त्यांना जड नाही. सगळे देणार नाहीत हेही मी समजू शकतो. गावात किमान दोन हजार लोक स्वइच्छेने प्रत्येकी २०० रुपये देणारे निघायला काय हरकत आहे?
शानदार साहित्य संमेलन साजरे करायला खूप खर्च लागतो. परंतु साधे आणि सुंदर संमेलन करायला अंबाजोगाईत किमान दोन लाख रुपये लागतात. ते तुमच्या सहकार्याशिवाय कसे गोळा होणार?
▪️विनंती
तुम्ही अगोदर स्वागत सभासद झाला असाल तर नवे ५ सभासद करावे. म्हणजे हजार रुपयांचे योगदान तुमच्या मार्फत व्हावे.
तुम्ही एव्हाना स्वागत सभासद झाला नसाल तर तात्काळ २०० रुपये भरून सभासद व्हावे.
▪️पैसे कोठे पाठवाल?
गोरख शेंद्रे (सचिव) यांच्या
94214 43391 या क्रमांकावर पाठवा. पाठवल्यानंतर त्यांना पैसे पाठवल्याचा फोन करा किंवा मॅसेज करा. ते व्हाट्सएप वर पावती पाठवून देतील.
▪️फलक लावणार
या संमेलनाच्या सर्व स्वागत सभासदांच्या नावाची यादी संमेलन स्थळी एका फलकावर आपण लावणार आहोत. त्यावर गुंचे नाव असणे म्हणजे तुम्ही या गावातील संस्कृती संवर्धनात योगदान दिले आहे. या गावातील साहित्य चळवळीला बळ दिले आहे. या गावात स्नेह सदभाव रहावा यासाठी तुम्ही सजग आहात! असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार लेखक व संवेदनशील विचारवंत अमर हबीब यांनी केले आहे.
