*जिल्ह्यातील सर्व उमेदवारांची धाकधुकं वाढली, कोणत्याही मतदार संघाचा निकाल स्पष्ट दिसत नसल्याने पैजा मात्र कार्यकर्ते कुठे दिसून येईनात*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान सभेचे चित्र स्पष्ट होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिल्याने राज्यातील 288 विधानसभा मतदार संघातील मतदार संघासह बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातील उमेदवारांची धाकधुकं वाढली असून कोणत्याही मतदार संघाचा निकाल स्पष्ट दिसत नसल्याने जय पराजयावर पूर्वी लावल्या जात असलेल्या पैजा मात्र कार्यकर्ते कुठे लावताना दिसून येत नाहीत.
राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, अवघ्या काही तासांवर कोणत्या मतदार संघात कोण विजयी होणार आणि महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार याच चित्र स्पष्ट होणार आहे. राज्य भरासह बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा यात समावेश असून या मध्ये बीड विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, त्यांच्याच विरोधात योगेश क्षीरसागर, शिवसेना सोडून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले अनिल दादा जगताप, कुंडलिक खांडे यांच्यात चौरंगी लढत झाली आहे. आष्टी विधानसभा मतदार संघात सुरेश धस, शेख महेबूब, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्यात चौरंगी लढत झाली आहे. गेवराई मतदार संघात बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, लक्ष्मण पवार, पूजा मोरे, मयुरी खेडेकर यांच्यात पंचरंगी लढत झाली आहे.
माजलगाव मतदार संघात प्रकाश दादा सोळंके, मोहन जगताप, रमेश आडसकर, माधव निर्मळ व बाबरी मुंडे यांच्यात पंचरंगी लढत झाली आहे. जिल्ह्यातील दोनच मतदार संघ असे आहेत की ज्या मतदार संघात एकास एक अशी दुरंगी लढत झाली आहे आणि ते म्हणजे परळी आणि केज मतदार संघ. परळी मतदार संघात राज्याचे कृषी मंत्री मा धनंजय मुंडे व राजेसाहेब देशमुख यांच्यात सामना रंगला असून केज विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार सौ नमिता मुंदडा व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या मध्ये कडवी झुंज झालेली आहे.
बीड जिल्ह्यातील या सहाही मतदार संघातील उमेदवारांची धाकधुकं वाढली असून परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांचा 1 लाख मतांनी विजय होईल असा दावा त्यांचे कार्यकर्ते करत असले तरी अन्य कोणत्याही मतदार संघाचा निकाल स्पष्ट दिसत नसल्याने जय पराजयावर पूर्वी लावल्या जात असलेल्या पैजा मात्र कार्यकर्ते कुठेही आणि कोणीही लावताना दिसून येत नाहीत.
