*घाटनांदूर येथील मतदान केंद्रावर वरील तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल, 7 आरोपी अटक* *मा धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन केली बन्सी अण्णा सिरसाट यांच्या तब्यतीची विचारपूस*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर झालेल्या तोडफोड प्रकरणी 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 आरोपीला अटक करण्यात आली आहे दरम्यान घाट नांदूर येथील दुसऱ्या एका घटनेत जखमी झालेले बीड जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष बन्सीधर अण्णा सिरसाट यांची मा धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
परळी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ऍड. माधव जाधव यांना परळी येथील बँक कॉलनी मध्ये मारहाण झाल्याचे व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. घाटनांदूर येथील पोलीस चौकीतील पोलीस शिपाई नानासाहेब धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.20) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास जि. प. प्राथमिक शाळा, जि.प. कन्या शाळा, सोमेश्वर विद्यालयातील मतदान केंद्रात अचानक 50 ते 60 लोक एमएच 06 एझेड 4208, एमएच 14 एवाय 35 आणि एमएच 44 एस 7716 या वाहनातून घातक हत्यारे, लाकडी दंडुके घेऊन आले. ऍड. माधव जाधव यांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस, होमगार्ड आणि केंद्राध्यक्ष यांना घातक हत्यारे आणि दंडुक्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी, केंद्राध्यक्ष जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी ईव्हीएम मशीन आदळून नुकसान केले. या फिर्यादीवरून अक्षय कमलाकर मोरे, सुरज अशोक निंबाळकर (दोन्ही रा. मोरेवाडी), शंभूराजे संजय देशमुख (माकेगाव), यशोदीप कल्याण किर्दंत, ओम प्रवीण किर्दंत, वैभव रमेश किर्दंत (सर्व रा. सातेफळ), अभिजीत कल्याण देशमुख (नांदडी), सिद्धेश्वर जाधव, सुनील देशमुख, वसंत मारोती करजाळकर बलांडे, नानासाहेब पूसकर देशमुख, विशाल जाधव, गणेश जाधव, विजय जाधव, अजय जाधव, संजय अनंत जाधव, गोट्या जाधव, उमाकांत जाधव (सर्व रा. घाटनांदूर) व इतर 15 ते 20 जण असे एकूण जवळपास 40 जणांवर कलम बीएनएस 109, 118(1), 132, 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 324(5), मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम, लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी गुन्हे दाखल होताच पोलिसांनी एका अल्पवयीन सह सात आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास एपीआय राजेंद्र घुगे करत आहेत.
दरम्यान हल्लेखोरांनी घाटनांदूर येथे बीड जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष बन्सीधर अण्णा सिरसाट यांच्या इनोव्हा गाडीवर दगडफेक केली यावेळी सिरसाट अण्णा सह त्यांच्या गाडीचे चालक बालासाहेब फड यांना मार लागला आसून महायुतीचे उमेदवार मा धनंजय मुंडे यांनी रात्री सिरसाट अण्णा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.
