अंबाजोगाई

*राज्यात सर्वच पक्षातील उमेदवारांच्या सभोवताली निष्ठावंत कार्यकर्ते कमी आणि गुत्तेदारांची व लाभार्थ्यांची फौज मोठ्या प्रमानावर*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
      अलीकडच्या काळात सर्वच पक्षातील उमेदवारांच्या सभोवताली निष्ठावंत कार्यकर्ते कमी आणि गुत्तेदारांची व लाभार्थ्यांची फौज मोठ्या प्रमानावर दिसत असल्याने जनमानसात उमेदवारांची प्रतिमा डावलताना दिसत आहे.
      एक काळ होता निवडणुका आल्या की, कार्यकर्ते स्वतःच्या घरची चटणी भाकरी बांधून प्रचारासाठी गावोगावी फिरत असत, ना त्यांना गाड्या घोड्यांची अपेक्षा ना पैशाची अपेक्षा आणि याला कारण ही तसेच होते. राजकीय पक्ष व त्यांचे नेते ही विशिष्ट ध्येया ने प्रेरित होते, त्यांच्या कडे एक विचारधारा होती. जनते मधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी ही विकासाचे ध्येय डोळ्या समोर ठेऊन काम करायचे, या राज्यात देशात असे काही आमदार खासदार होऊन गेले ज्यांनी जनकल्याना साठी केवळ आपलं आयुष्यच खर्च केलं असं नाही तर राजकारणातून पैसे, संपत्ती कमवण्या ऐवजी स्वतःची वडिलोपार्जित संपत्तीही खर्च करून टाकली.
     मात्र मागील काही वर्षात राजकारणाची व्याख्याच बदलून गेली आहे. राजकारणा मधून पैसा आणि पैशातून राजकारण हे गणितचं बनल्या गेल्याने पैशासाठी पक्ष, निष्ठा बाजूला ठेऊन राजकारणा मधील मंडळी चक्क प्रवाहा प्रमाणे आपले बाप बदलू लागले आहेत. पैशा साठी काही लोकप्रतिनिधीनी तर चक्क लाजाच सोडल्या प्रमाणे कार्यकर्ते आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्या ऐवजी स्वतः गुत्तेदारी करून पैसे कमावत असल्याची बीड जिल्ह्यासह राज्यात उदाहरणे आहेत. कुठलाही घाम न गाळता नेत्या कडे जमा होत असलेली संपत्ती पाहता कार्यकर्त्यांच्याही भावना का बदलणार नाहीत. नेत्यात होत असलेला बदल पाहून बऱ्याच नेत्याकडे पैशा शिवाय कार्यकर्ते ही जागेवरून हलण्यास तयार नाहीत, सर्वच पक्षातील उमेदवारांच्या सभोवताली निष्ठावंत कार्यकर्ते कमी आणि गुत्तेदारांची व लाभार्थ्यांची फौज मोठ्या प्रमानावर दिसत आहे. सोशल मीडिया मुळे क्षणार्धात देश विदेशातील घडामोड प्रत्येका पर्यंत पोचत आहे. त्यामुळे पक्षाच्या किती जरी मोठ्या नेत्याच्या जाहीर सभा लागल्या तरी
सामान्य जनता तर या सभेकडे फिरकायला तयार नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला जाण्यासाठी स्वतंत्र गाडी व खर्च पाण्याची अपेक्षा आहे. जाहीर सभाना होणारी गर्दी ही पैसे देऊन जमा होणारी गर्दी आहे हे काही नवीन राहिलेले नाही. उमेदवारा साठी तळमळीने फिरणारा निस्वार्थी कार्यकर्ता सूक्ष्म दर्शका मधून पहावा लागतो आहे एवढे करून निवडून येणारा लोकप्रतिनिधी निवडणुका झाल्यावर स्वतःच्या स्वार्था साठी जनतेने दिलेला कौल पायदळी तुडवत कुठे कोलांट उडी खाईल याचा भरोसा नाही आणि त्यामुळेच जनमानसात उमेदवारांची प्रतिमा कुठेतरी डावलताना दिसत आहे हे वास्तव नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!