अंबाजोगाई

वंचितांच्या समस्यांबाबत समाजभान निर्माण व्हावे — अविनाश भारती — आधार माणुसकीच्या उपक्रमांतील ५०० कुटुंबाना फराळ वाटप

  • वंचितांच्या समस्यांबाबत समाजभान निर्माण व्हावे


    अंबाजोगाई, दि. १ (प्रतिनिधी) वंचित व गरिबांच्या समस्यांचे समाजभान प्रत्येकात असणे गरजेचे आहे. ही जाणीव ठेवून गरिबांच्या घरातील अंध:कार दूर करण्याचे काम आधार माणुसकीचा उपक्रम करीत आहे. असे प्रतिपादन युवा वक्ते अविनाश भारती यांनी येथे केले.
    येथील आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्फे गुरुवारी (दि.३१) सायली लाॅन्समध्ये बीड व लातूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व पालकांचे छत्र हरवलेल्या ५०० कुटुंबाना दिवाळीचा गोड फराळ वाटप करण्यात आला. त्या प्रसंगी अविनाश भारती हे बोलत होते. या कार्यक्रमास लातूरच्या आर. सी. सी. क्लासेसच्या संचालिका मिनल मोटेगावकर, उद्योजक दुर्गा पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सहसचिव वर्षा शिंदे, उद्योजक रक्षा सोळंकी, पोदार स्कूलच्या सचिव सावली गित्ते, प्रियदर्शनी अभ्यासिकेच्या संचालक ज्योती गाठाळ व सुलक्षण पवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
    श्री. भारती उपस्थित महिलांचे उद्बोधन करताना म्हणाले, की स्त्री ही मनाने खंबीर असते, पतीच्या पश्चात ती संकटांना तोंड देऊन मुलांना घडविते, ती घरात पणतीच्या स्वरूपात असते. सतत तेवत राहणारी आणि कुटूंबाला प्रकाश देणारी असते. अशा या वंचित घटकातील व पतीचे छत्र हरवलेल्या महिलांना बळ देण्याचे काम आधार माणुसकीचा उपक्रम करीत आहे. दिव्याची किंमत ही प्रकाशात नव्हे तर अंधारात होते. हे अंधारातील दिवे गरीबांच्या घरात लावून त्यांना प्रकाशमय करण्याचे काम आधार माणुसकीचा उपक्रम करीत असल्याच्या भावना श्री. भरती यांनी व्यक्त केल्या.

    मुलांना प्रेमानेच घडवा

    पतीचे छत्र हरवले असले तरी, स्वत: खंबीर होऊन, कष्ट व मेहनतीचे संस्कार मुलांवर बिंबवा आणि प्रेमाने त्यांना घडवा. कारण शिक्षणच कुटुंबातील अंधार दूर करू शकते. दु:ख विसरून आपल्या जीवनात सकारात्मकता आणून आयुष्य बदलून टाकण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मिनल मोटेगावकर यांनी उपस्थित महिलांना केले.
    —-
    यावेळी वर्षा शिंदे, सावली गित्ते यांची भाषणे झाली. याप्रसंगी आधार माणुसकीच्या उपक्रमांतील वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविलेले विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक उपक्रमांचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले. विद्यार्थी प्रतिक्षा चिंचोळे, अंजली जगताप, पालक इंदुबाई वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन सहशिक्षक शिवानंद गुळवे यांनी केले. प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांना फराळाच्या बॅग वितरीत करण्यात आल्या. या उपक्रमासाठी चांगुलपणा चळवळ व मैत्री ग्रुपनेही पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!