गरजू, निराधार व्यक्ती साठी फराळ महोत्सव 2024 चे आयोजन सरस्वती गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम
अंबाजोगाई -: (प्रतिनिधी)
शहर व परिसरातील पालात राहणाऱ्या, निराधार व वृद्धाश्रमातील व्यक्तीसाठी दिपावली निमित्य आपल्या घरात बनवलेल्या फराळाचा वाटा पोचवण्याच्या उद्देशाने येथील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने फराळ महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले असून फिरती मानूसकीची भिंत 2.O या उपक्रमा मधून शहरातून जमा केलेला फराळ गरजू व्यक्ती पर्यंत पोचवला जाणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी साहित्यिक अभिजित जोंधळे, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, जगदीश जाजू, संजय जोगदंड, प्रेमचंदजी मुथा, संतोषजी मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित अभिजित जोंधळे या वेळी बोलताना म्हणाले की, सरस्वती गणेश मंडळाची आगळी वेगळी ओळख अंबाजोगाईच नव्हे तर बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात झाली. एखाद्या माणसाला आपल्यात बोलावून जुडवून घ्यावे वाटते यात आपलं यश आहे. दिवाळी करत असताना आपल्या आनंदाचा परीघ वाढवणे ही खरी दिवाळी. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश मंडळाची सुरवात केली तो उद्देश साध्य करण्याचे काम सरस्वती गणेश मंडळ करते आहे ही कौतुकाची बाब आहे.
या वेळी बोलताना दत्तात्रय अंबेकर म्हणाले की, सरस्वती गणेश मंडळाचे पदाधिकारी आपला अमूल्य वेळ खर्च करून गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव आणि आता दिवाळी मधे जे सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्या बद्दल आपलं कौतुकच असून दिवाळी निमित्य फराळ महोत्सवा 2024 आणि त्या साठी फिरती माणुसकीची भिंत 2. O ही नविन संकल्पना याच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
या उपक्रमा विषयी अधिक माहिती देताना रचना परदेशी म्हणाल्या की
सामाजिक उपक्रम राबवत असताना अध्यक्षांच्या कल्पने मधून साकरलेली आणि गरजू लोकांच्या मदती साठी उभा केलेली ही माणुसकीची भिंत अधिक भक्कम होण्यासाठी दिवाळी निमित्य गरजू आणि वृद्धाश्रमातील व्यक्तींना आपल्या ताटा मधील थोडासा फराळ वाटून त्यांच्या सोबत दिवाळी साजरा करण्याचा, दिवाळीचा आनंद वाटण्याचा छोटासा प्रयत्न असून त्या साठी बनवलेली ही गाडी शहरात फिरून जमा केलेला फराळ गरजू व्यक्ती पर्यंत पोचवणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना परदेशी यांनी प्रास्ताविक निलेश मुथा यांनी केले तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती गणेश मंडळाचे अध्यक्ष कुलदीप परदेशी, सचिव निलेश मुथा, अक्षय परदेशी, समीर लाटा, योगेश परदेशी, हर्ष मुथा, निलेश परदेशी वैष्णवी भानप, शेख जमशेद, कमलेश परदेशी, प्रेमा मुथा, विजया मुथा सह इतर पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.
