कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या झाली संविधानाची होता कामा नये –ॲड. असीम सरोदे
अंबाजोगाई (प्रतिनिधि):-
संविधानाचे अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांनी कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली नाही,
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या झाली, संविधानाची होता कामा नये,असं वक्तव्य केलं आहे.लोकांचे भले झाले पाहिजे अशी शासन व्यवस्था व राजकीय व्यवस्था पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.ते सोमवारी (०७ ऑक्टोबर) रोजी अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती व्याख्यानमाला आयोजित कार्यक्रमात संविधानाची पायमल्ली होतेय का?या विशेष कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर ॲड. श्रिया आवले ॲड. बाळकृष्ण निंढाळकर उपस्थित होते.
बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान वेगवेगळे विषय घेऊन व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या वर्षी बदलत्या राजकीय, सामाजिक स्थितीवर सडेतोडपणे भाष्य करणारे ॲड.असिम सरोदे यांचे संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना खरंच संविधान जखमी होत आहे का? या विषयावर व्याख्यान व ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर प्रकट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
असीम सरोदे म्हणाले,अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या झाली,संविधानाची हत्या होता काम नये.कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली नाही.दखलपात्र गुन्हा असेल तेव्हा पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतं पण तसं होत नाही. कायदा हा न्याय मागण्याचा मार्ग आहे.आम्हाला न्यायाचे,संविधानाचे राज्य पाहिजे.लोकांचे भले झाले पाहिजे अशी शासन व्यवस्था व राजकीय व्यवस्था पाहिजे. जनतेचे पैसे जनतेच्या भल्यासाठीच वापर झाला पाहिजे.प्रतिमा,पुतळे राजकारण करण्यापेक्षा याच्या बाहेर आलेले लोक खरे लोकशाहीचे तारक आहेत. कट्टरवादी लोकांचा देशाला धोका आहे. मग ते हिंदू, मुस्लिम, अन्य कुणी असो.अशी सडेतोड मांडणी यांनी केली.सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड.अजय बुरांडे सूत्रसंचालन सविता बुरांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुहास चंदनशिव यांनी मानले.
