*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाकवी वामनदादा कर्डक यांना डिलीट पदवी द्यावी – प्रा.डॉ.सागर जाधव
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील लोकशाहीर वामनदादा कर्डक कला अकादमी, अंबाजोगाई यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त वामनदादा यांच्या सहवासातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार आणि यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवी, गायक मनोजराजा गोसावी आणि धम्मदिक्षा वाहुळे यांचा भीम गीत गायन कार्यक्रम रविवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद कार्यालय परिसर, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला होता.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त दादांनीच गायिलेल्या बुद्ध-प्रबुद्ध गीतांच्या दैदीप्यमान कार्यक्रमाचे व वामनदादांच्या सहवासातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ललिताताई घोडके (वामनदादा कर्डक यांची लेक) या होत्या. तर यावेळी डॉ.प्रो.एम.डी.इंगोले (आंबेडकरवादी हिंदी लेखक व वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे अभ्यासक), प्रा.दिपक जमदाडे (बुलढाणा) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी मनोजराजा गोसावी (यवतमाळ) यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव घोडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२४ सालचा लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार आणि प्रा.डॉ.सागर जाधव, यवतमाळ (संपादक व प्रकाशक, वामनदादा कर्डक समग्र वाङमय खंड १ ते १६) यांना आयु.देवदास भाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२४ सालचा लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रा गौतम गायकवाड लिखित “लोककवी वामनदादा कर्डक यांच्या गीतातील महान स्ञी पुरूष व्यक्तिरेखा” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात ‘वंदन माणसाला’ या जगन बापू सरवदे यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.गौतम गायकवाड यांनी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांचे प्रवर्तनवादी विचार गीत, संगीत, गायनाच्या माध्यमातून ज्यांनी ‘जिथे गांव, तिथे भीमाचे नांव पोहोंचवणारा, ‘भीमसा कौन बडा है, बताओ इस धर्तीपर, कोई नहीं. एक नया आंबेडकर पैदा हो’ यासाठी आयुष्यभर भीमाईचे गीत गात संपूर्ण जीवन जगलेले वामनदादा कर्डक यांचा दिर्घ सहवास अंबाजोगाईच्या भूमीला लाभला.
अशा या महाकवीच्या जयंतीनिमित्त हा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.सागर जाधव (यवतमाळ) म्हणाले की, वामनदादांनी आयुष्यभर महामानव बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, प्रचार व प्रसार केला. गावोगावी बुध्द आणि भीम गीतातून प्रबोधन केले. प्रवर्तनाची दृष्टी दिली. जोपर्यंत जगात बाबासाहेबांचे नांव राहिल तोपर्यंत वामनदादांना जग विसरणार नाही. दादा आपल्या गाण्यातून जीवंत आहेत. आंबेडकरी चळवळीला गीतातून दिशा देणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डक यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डिलीट ही मानद पदवी द्यावी अशी मागणी प्रा.डॉ.जाधव यांनी यावेळी केली. सत्काराला उत्तर देताना डॉ.प्रो.एम.डी.इंगोले म्हणाले की, दादांनी वंदनीय बाबासाहेबांना गीतांतून विविध नावांनी संबोधले आहे. मानवी मुल्यांचा विचार करणारी अनेक प्रतिके वापरली आहेत. दादांच्या कविता आणि गीतांतून क्रांतीची मशाल तेवत राहीली असल्याचे डॉ.प्रो.इंगोले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना ललिताताई घोडके यांनी आपण दादांची लेक आहोत असे सांगून एका चालत्या बोलत्या विद्यापीठात आपली जडणघडण झाल्याचे नमूद करून ललिताताई यांनी दादांच्या अनेक आठवणी कथन केल्या. यावेळी बळीराम उपाडे, महादेव भालेराव कु.भुतकर, प्रा. रमेश सरवदे, कु.सरकटे स्वितम इंगळे, अमोल तरकसे डॉ एम एच कांबळे यांनी दादांची विविध गिते सादर केली. यानंतर मनोजराजा गोसावी (यवतमाळ) आणि धम्मदिक्षा वाहुळे यांनी ‘मी बुध्द गयेचा वारा’, ‘रमा तू मला क्षमा कर’, ‘नीच नितीचा कापू गळा’ वादळ वारा यांसारख्या एकापेक्षा एक सरस, जोश पूर्ण, प्रबोधनपर गीतं गावून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी दादांच्या सहवासातील स्थानिक कलावंत जगन सरवदे, डि.एन.आचार्य, बलभीम तरकसे, शाहीर गौतम सरवदे तसेच परीवर्तनवादी चळवळीतील लेखक प्रा.गौतम गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार राहुल सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरात ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक, महिला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रमुख गायक राहुल सुरवसे, भीमशाहीर गौतम सरवदे, गायक महादेव भालेराव, प्रा.गौतम गायकवाड, जगन सरवदे, , अकादमीचे अध्यक्ष शंकर लोंढे, महादेव माने, रमाकांत वाव्हळे, डि.एन.घोबाळे, गायक बळीराम उपाडे, आकाश वेडे यांनी पुढाकार घेतला होता.
=======================
=======================
