*आडसकर साहेब, “अभि नही तो कभी नही” माजलगांव मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहिल्यास पक्ष बदलल्या शिवाय पर्याय नाही*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील 15 वर्षा पासून आमदारकीचे स्वप्न पाहणारे आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये पुन्हा एकदा माजलगांव मतदार संघा मधून आमदारकीसाठी डाव लावणार असून राज्यातील सत्तेच्या खिचडी मुळे माजलगांव मतदार संघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडेच राहिला तर आडसकर भाजपात असल्याने त्यांना पक्ष बदलल्या शिवाय दुसरा पर्याय पुढे राहणार नाही आणि हे केल तरच त्यांचं आमदारकीच स्वप्न पूर्ण होऊ शकतं नसता “अभि नही तो कभी नही” अशी परस्थिती निर्माण होणार आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अनेक नेते तयार केले. मात्र त्या वेळी सत्तेसाठी ते सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. महायुतीची सत्ता येणार असे दिसू लागताच याच नेत्यांनी पुन्हा भाजपात येण्याचा प्रवास सुरू केला या प्रवासा मधील एक प्रवासी म्हणजे रमेश आडसकर.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशावरून सन 2009 साली गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात आडसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन लोकसभा निवडणूक लढविली होती. अपेक्षेप्रमाणे मुंडेंनी 1 लाख 40 हजार मतांनी विजयश्री खेचून आणली होती. त्याच आडसकरांनी महायुतीची सत्ता येण्याची शक्यता दिसू लागताच भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आडसकर यांनी त्यावेळी औरंगाबादमध्ये प्रवेश केला.
रमेश आडसकर हे बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असलेले नेते आहेत. सध्या ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. केज मतदार संघावर पकड असलेल्या मुंदडा परिवाराचे आणि अडसकरांचे गेल्या 20 वर्षात कधीच जमले नाही. त्यामुळे केज मतदार संघात कोणतेही राजकीय भविष्य नसल्याने आडसकर यांनी माजलगांव मतदार संघाचे आमदार होण्याचे स्वप्न समोर ठेऊन मागील 10 वर्षा पासून माजलगाव मतदार संघात आपली मोर्चे बांधणी सुरू केली.
मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये माजलगाव मतदार संघातून आडसकरांनी भाजपा कडुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश दादा सोळंके यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र याही ठिकाणी त्यांना अपयश पदरात पडले त्यांना जवळपास 13 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यानच्या काळात आडसकरांना विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळेल असा कयास मानला जात होता मात्र यातही त्याना गुलालाचे योग जुळून आले नाहीत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकी मध्ये पराभव होऊन ही रमेश आडसकर खचून गेले नाहीत. त्यांनी जिद्द कायम ठेवून माजलगाव मतदार संघात सतत संपर्क ठेऊन मतदार संघांची नाळ काही तुटू दिली नाही यामुळेच आज ही या मतदार संघात भाजप म्हणून नव्हे तर रमेश आडसकर म्हणून त्यांची क्रेज कायमच आहे हे नाकारून चालणार नाही.
सन 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार अडीच वर्षे सत्तेवर राहिले आणि मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेले 2 गट यातून उदयाला आलेले किळसवाणे राजकारण आणि यातून राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीच्या नेत्याला मिळालेली सहानभूती व यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश संपूर्ण देशाने पाहिले.
याचाच दुसरा अंक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आता राज्य आणि देश पाहनार असुन विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राज्य भरातील सर्वच मतदार संघा मधून उमेदवारी मागण्यांसाठी इच्छुकांची इनकमिंग मोठ्या प्रमानावर दिसते आहे. लोकसभा निवडणूक निकाला वरून बीड जिल्ह्यातील माजलगांव मतदार संघात ही राष्ट्रवादी काँग्रेसला तसे पोषकच वातावरण आहे मात्र हे कॅश करणारा उमेदवार हवा आहे आणि तो रमेश आडसकरांच्या रूपाने मतदार संघाला दिसतो आहे.
खर तर लोकसभा निवडणुकी मधेच रमेश आडसकरांना खासदार होण्याची संधी चालून आली होती. राज्यात जरांगे फॅक्टरने जोर धरलेला होता आणि वातावरण भाजप विरोधी असल्याने
रमेश आडसकरांनी हवेचा झोक पाहून तात्काळ निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असता तर आज बीडच्या खासदरकीची लॉटरी आडसकरांना लागली असती. मात्र नशिबात राजयोग असल्या शिवाय कुठलीच संधी चालून येत नाही म्हणतात ते कदाचित खर ही असेल.
मागील 15 वर्षा पासून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या रमेशराव आडसकराना येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये राजयोग दिसून येत आहेत. आडसकर पुन्हा एकदा माजलगांव मतदार संघा मधून आमदारकीसाठी डाव लावणार हे निश्चित आहे मात्र राज्यातील सत्तेच्या खिचडी मुळे माजलगांव मतदार संघ महायुतीच्या तडजोडी मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिला तर आडसकर भाजपात असल्याने त्यांच्या जवळ जनसंपर्क, पैसा, मनुष्यबळ, कार्यकर्त्यांची फळी सर्वकाही असतानाही आमदारकीची संधी मिळणार नाही त्या साठी त्यांना पक्ष बदलल्या शिवाय दुसरा पर्याय पुढे राहणार नसून तो पर्याय फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटच असू शकतो. वास्तविक माजलगाव मतदार संघात लोकसभा निवडणुकीत मनोहर डाके, प्रा काळे, मंजूर शेख, प्रा ईश्वर मुंडे या मंडळींनी बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडून आणण्यात मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि या सर्व मंडळीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा कडुन उमेदवारीची मागणीही केल्याचे समजते. आशा परस्थिती मध्ये अडसकरांनी आपली ताकत लावली आणि रा कॉ शरद पवार गटाचा पर्याय निवडला तरच त्यांचं मागील 5 वर्षात लावलेल्या नियोजनाच्या व जनसंपर्काच्या ताकतीवर आमदारकीच स्वप्न पूर्ण होऊ शकेलं. नसता “अभि नही तो कभी नही” अशी परस्थिती निर्माण होउ शकते हे मात्र निश्चित.
