*स्वा.रा.ती. रुग्णालयाचा माझी विद्यार्थी म्हणून येथील सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध – खा.डॉ. अजित गोपछडे*
*कॅन्सर आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी प्रयत्न करणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्वा.रा.ती. रुग्णालयाचा माजी विद्यार्थी म्हणून येथील सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून
कॅन्सर आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशी माहिती खासदार अजित गोपछडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी बोलताना ते म्हणाले की माझं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण स्वा.रा.ती.वैद्यकीय महाविद्यालयात झाले असून येथील समस्यांची मला चांगली जाणीव आहे. शिक्षण घेत असताना देखील निवासी डॉक्टरांच्या समस्येसाठी मी आठ दिवस आंदोलन केले होते. तेंव्हाही परिस्थिती तशीच होती आणि अजूनही त्यात काही बदल झालेला दिसून येत नाही. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या ५० वरुन १५० झाली आहे. परंतू, मनुष्यबळ आहे तितकेच आहे. राज्यसभेचा खासदार या नात्याने येणाऱ्या काळात हे चित्र नक्कीच आपल्याला बदलेलं दिसेल, यासाठी मी केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे माझी प्रतिष्ठा पणाला लावेल, असे राज्यसभेचे खा. डॉ.अजित गोपछडे म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
डॉ.गोपछडे पुढे बोलताना म्हणाले की,
‘स्वा.रा.ती.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला स्थापन होऊन ५० वर्षे होत आहे.वैद्यकीय महाविद्यालयाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी मी केंद्रीय आरोग्य मंत्री यांना लगेचच भेटणार आहे. त्यासोबतच स्वा.रा.ती. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय आणि ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात ही दोन्ही मुद्दे मार्गी लागलेले आपल्याला दिसतील, असे मी आश्वासित करतो, असेही गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषदेला ‘भाशिप्र’ चे माजी कार्यवाह नितीन शेटे आणि युवा नेते विनोद पोखरकर तसेच पत्रकार उपस्थित होते.
Post Views: 258