मुक्तीसंग्रामच्या लढ्यात महिलांचे अनन्यसाधारण योगदान- डॉ.कल्पनाताई चौसाळकर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
निजामाच्या जुलमी राजवटी विरुद्ध संघर्ष करत स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक पुरुष स्वातंत्र्यसैनिक यांच्या बरोबरीने मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढ्यात महिलांनी अनन्यसाधारण योगदान दिले आहे असे प्रतिपादन लोकमान्य टिळक विद्यालयाच्या पालक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.कल्पनाताई चौसळकर यांनी केले.
पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात दि.१७ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी संपन्न झालेल्या ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.चौसाळकर यांनी ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान’ याविषयी मार्गदर्शन केले.
निजामशाहीत रझाकारांनी जनतेवर केलेल्या अनन्वित अत्याचारा विरुद्ध संघर्ष करताना अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची पर्वा न करता आहुती दिली.त्यांच्या बरोबरीने अनेक स्वातंत्र्यसैनिक महिला ज्यामध्ये श्रीमती.पानकुवर,रुक्मिणीबाई चौसाळकर,बोधनकर,दगडुबाई शेळके यांनी मुक्तीसंग्रामच्या लढ्यात अनन्यसाधारण योगदान दिले.यात दगडुबाई शेळके यांनी स्वतः बंदूक चालविणे,बॉम्ब फेकणे इ.मध्ये स्वयंप्रशिक्षित होऊन व अनेक महिलांना प्रशिक्षित करून या लढ्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मुक्तीसंग्रामच्या लढ्यातील महिला क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती घेऊन प्रकल्प तयार करावा असे शेवटी डॉ.चौसाळकर यांनी आवाहन केले.
या दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात सकाळी ठीक ७:४० वा डॉ.कल्पनाताई चौसाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.संजयराव विभूते,सरपंच श्रीहरी होळकर तसेच ग्रा.प.सदस्य रामलिंग वाघमारे, पालक भास्करराव निकम,भगवानराव निकम, ऋषिकेश नेवल,संतोष सावरे,संतोष निकम,श्रीकृष्ण निकम उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
