अंबाजोगाई

गणेशोत्सवानिमित्त उत्कृष्ट व्यसनमुक्तीपर देखावा स्पर्धेचे आयोजन; गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा – आयोजक व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांचे आवाहन

अंबाजोगाई (वार्ताहर) : सार्वजनिक गणेशोत्सवात उत्कृष्ट व्यसनमुक्तीपर देखावा सादर करणाऱ्या गणेश मंडळांना आकर्षक बक्षिसे देणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक समितीचे इंडीयन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देवून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अंबाजोगाई मध्ये उत्कृष्ट व्यसनमुक्तीपर देखावा सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाधान मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. दरवर्षी डॉ.राजेश इंगोले यांच्या पुढाकारातून या स्पर्धा गेल्या सात वर्षांपासून सातत्याने घेण्यात येत आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाज एकत्रित येऊन समाजासाठी विधायक कार्य करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला त्याच विचारांचा वारसा जपण्याचे काम म्हणून समाजप्रबोधन व्हावे आणि समाज व्यसनापासून दूर रहावा या करिता गणेशोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे अंबाजोगाई शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ जे दरवर्षी आकर्षक, समाजातील व्यसनाधीनतेवरवर प्रबोधन, जनजागृती करणारे देखावे साकारतात त्यांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी गणेश मंडळांना पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट व्यसनमुक्ती पर देखाव्यास ११ हजार रूपये, द्वितीय क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेश मंडळास ७ हजार रूपये आणि तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेश मंडळास ५ हजार तसेच दोन गणेश मंडळास उत्तेजनार्थ प्रत्येकी २ हजार रूपये इतक्या रकमेची रोख पारितोषिके देवून विजेत्या गणेश मंडळांना गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट व्यसनमुक्तीपर गणेश देखाव्यांची निवड करण्यासाठी एक समिती ही गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी त्यांची नांव नोंदणी करण्यासाठी समाधान व्यसनमुक्ती केंद्र मोबाईल क्रमांक – ९५२९८९३०३० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!