मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी विविध कार्यक्रम; योगेश्वरी शिक्षण संस्थेचा पुढाकार
अंबाजोगाई – राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. चंद्रशेखर बर्दापूरकर व सचिव कमलाकर चौसाळकर यांनी दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता योगेश्वरी संस्थेच्या मैदानावर देवधानोरा येथील जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मणराव बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल तसेच हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभास पुष्पांजली व मानवंदन होऊन सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा स्मृती दालनाचे उद्घाटन लक्ष्मणराव बोंदर यांच्या हस्ते हुतात्मा शोएब उल्ला खान स्मृती कक्षाचे उद्घाटन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेश जोशी यांच्या हस्ते तर पू. स्वामीजी निवास याचे उद्घाटन पुण्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ.सुरेश खुरसाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. योगेश्वरी शिक्षण संस्था परिसरात १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
