शैक्षणिक वृध्दी सोबत शारीरिक वृद्धीसाठी खेळ अत्यंत आवश्यक – दत्तात्रय पाटील यांचे मत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)– शैक्षणिक वृध्दी सोबत शारीरिक वृद्धीसाठी खेळाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले. येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या मुकुंदराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद क्रीडा विभाग व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करतांना दत्तात्रय पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंदराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब माने तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सहसचीव सौ. विजयाताई पाटील, गटशिक्षणाधिकारी सी. आर. शेख, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, मुमताज पटेल, भिमाशंकर नांदुरकर, तालुका क्रिडा अधिकारी दत्तात्रय देवकाते,केंद्र प्रमुख माणिक सोळुंके, मुख्याध्यापिका सुनिता तांबटकर (धायगुडे) व इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या विस्तारीत भाषणात दत्तात्रय पाटील पुढे म्हणाले की, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात पुस्तकी शिक्षण घेण्यासोबतच क्रीडा शिक्षण घेणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तकी शिक्षण हे बुध्दीची मशागत करणे तर क्रीडा शिक्षण हे शरीराची मशागत करते. माणसाच्या सर्वांगिण विकासासाठी पुस्तकी शिक्षण आणि क्रीडा शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सी. आर. शेख, शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णकार, पठाण, नांदुरकर, आणि तालुका क्रीडा अधिकारी दत्तात्रय देवकते यांची शुभेच्छापर भाषणे झाली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक बालासाहेब माने यांनी कब्बडी खेळाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच विविध खेळांच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन केले व या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनिता तांबटकर यांनी मानले.
