सुदर्शन रापतवार यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे १५ सप्टेंबर रोजी प्रकाशन
ना. धनंजय मुंडे, खा. रजनीताई पाटील, डॉ. वृषाली किन्हाळकर, आ. नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी यांची उपस्थिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी लिहिलेल्या “असामान्य”, “सहज सुचलं म्हणून” आणि “मंदीराचे गाव” या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लेखक सुदर्शन रापतवार, माध्यम पब्लिकेशन आणि माध्यम डिजिटल न्यूज नेटवर्क यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सैहळ्यासाठी राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब, राज्यसभेच्या सदस्य रजनीताई पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वृषालीताई किन्हाळकर, आ. नमिता अक्षय मुंदडा आणि महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी हे उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारीतेच्या अनुभवातुन सिध्द झालेल्या प्रगल्भ विचार आणि समग्र लेखणीतून लिहिलेल्या “असामान्य”, “सहज सुचलं म्हणून” आणि “मंदीराचे गाव” ही तीन ही पुस्तकं माध्यम पब्लिकेशन च्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहेत. अंबाजोगाई सारख्या अर्धशहरी विभागात राहुन ही पुस्तकं निर्मितीच्या क्षेत्रात पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या माध्यम प्रकाशनाने ही तीन ही पुस्तकांची निर्मिती अतिशय दर्जेदार पध्दतीने केली आहे.
सलग चाळीस वर्षे सकारात्मक पत्रकारीतेला खतपाणी घालणाऱ्या सुदर्शन रापतवार यांचे साहित्य निर्मितीतील हे पहीलेच पाऊल असून एकाच वेळी तीन पुस्तकांचे लिखाण करुन त्यांचे प्रकाशन करण्याचा हा त्यांचा धाडसी प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्यास साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लेखक सुदर्शन रापतवार, माध्यम पब्लिकेशन आणि माध्यम डिजिटल न्यूज नेटवर्क या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
▪️ मराठवाड्यातील पहिला प्रयत्न
ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा हा मराठवाड्यातील पहिलाच उपक्रम ठरावा असा आहे. एका पत्रकाराने लिहिलेल्या, त्याच पत्रकाराच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या एकाच कार्यक्रमात प्रकाशन होणारा हा तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा हा पहिलाच उपक्रम ठरेल.