खर्चास पैसे न दिल्याचा राग धरून सख्या चुलत्याचा खुन, आरोपीस सश्रम जन्मठेप सरकार पक्षाकडुन अॅड. लक्ष्मण फड यांनी मांडली भक्कमपणे बाजु
खर्चास पैसे न दिल्याचा राग धरून सख्या चुलत्याचा खुन, आरोपीस सश्रम जन्मठेप
सरकार पक्षाकडुन अॅड. लक्ष्मण फड यांनी मांडली भक्कमपणे बाजु
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
– खर्चासाठी चुलत्याने पैसे दिले नाही याचा मनात राग धरून सख्या चुलत्यावर कत्तीने सपासप वार करून खुन करणा-या आरोपी पुतण्यास आज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. अजितकुमार भस्मे साहेब यांनी सश्रम जन्मठेप व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, घाटनांदूर येथील जनार्थन धोंगडे हे आपल्या कामावरून घर परतत असतांना आरोपीने आदल्या दिवशी त्या पैसे का दिले नाहीत. याचा राग मनात धरून भर रस्त्यात जनार्धन धोंगडे यांच्यावर आरोपी अर्जुन दत्तात्रय थोंगडे याने कत्तीने सपासप वार केले. जखमी झालेल्या जनार्धन धोंगडे यांना त्यांची मुलगी व भाउ यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारार्थ दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषीत केले. यावरून मयताची मुलगी नामे वैशाली वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरनं ०४/२०२१, कलम ३०२ अन्वये आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल होताच त्याबाबतचा तपास एपीआय एस. व्ही. सावंत यांनी सखोल पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ७साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी वैशाली व प्रत्यक्षदर्शी हनुमंत धोंगडे यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर प्रकरणात आरोपीकडुन तो वेडा आहे व सदरचे कृत्य त्याचेकडुन वेडाच्या भरात झाले असा बचाव घेतला गेला. परंतू त्या मुदद्यावर सरकार पक्षाकडुन व न्यायालयाकडुन तीन डॉक्टरांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच सदरचे कृत्य वेडाच्या भरात होण्याइतपत आरोपी मानसिक रुग्ण नाही ही बाब सरकारपक्षाकडुन सिद्ध करण्यात आली. तसेच पुन्हा आरोपीच्या वतीने त्याच्या बचावापोटी एका डॉक्टरची साक्ष नोंदवण्यात आली. परंतू सदरची साक्ष व आरोपीचा बचाव मा. न्यायालयात खारीज केला व सरकार पक्षाने दिलेले पुरावे ग्राहय धरून आरोपीस सश्रम जन्मठेप व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी सरकारपक्षाची भक्कमपणे बाजु मांडली. त्यांना अॅड. सचिन कुलकर्णी यांनी सहकार्य केले. पैरवी म्हणुन मपोह भाग्यश्री उडाणशीव यांनी सहकार्य केले.



