Tuesday, September 9, 2025

◆ प्रा. डॉ. विवेकानंद राजमान्य यांना आंतरभारतीचा स्नेहवर्धन पुरस्कार प्रदान

*अंबाजोगाईत पदोपदी-क्षणोक्षणी स्नेहसंवर्धनाचा अनुभव*
*प्रा. डॉ. विवेकानंद राजमान्य*

◆ प्रा. डॉ. विवेकानंद राजमान्य यांना आंतरभारतीचा स्नेहवर्धन पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई प्रतिनिधी- (15 ऑगस्ट)

आंतरभारतीच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने दर वर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट रोजी 12 वा स्नेहवर्धन पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. या वर्षी अंबाजोगाई परिसरात अनेक इंजिनियर घडवणारे स्थापत्य शास्त्राचे प्रमुख प्रा. डॉ. विवेकानंद राजमान्य यांना हा पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी आंतरभारती, आंबाजोगाईच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शैलजा बरुरे होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी (गोवा), अमर हबीब (विशेष अतिथी तथा मार्गदर्शक आंतरभारती), सिंधुताई पनिकर (गतवर्षीच्या सत्कारमूर्ती) व कार्यक्रमाचे संयोजक ऍड. प्रवीण बजाज मंचावर उपस्थित होते. हा पुरस्कार गतवर्षीच्या सत्कारमूर्ती सिंधुताई पनिकर यांच्या हस्ते व मंचावरील उपस्थितीत देण्यात आला.

*स्नेहवर्धन पुरस्कार*

सानेगुरुजी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरभारतीची स्थापना केली होती. तेच उद्देश्य पुढे नेणारा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अन्य राज्यातून आलेल्या, अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

*प्रेमळ माणसांचे गाव*

डॉ विवेकानंद राजमान्य सुमारे 30 वर्षांपूर्वी आंबाजोगाईत आले व आंबाजोगाईचे झाले. ते म्हणाले की, “अंबाजोगाईची माणसे खूपच प्रेमळ आहेत. मला येथे काम करताना कधीच परकेपण वाटले नाही. गावातील लोकांनी मी अन्य राज्यातील परका माणूस आहे अशी जाणीव होऊ दिली नाही.”

प्रमुख पाहुणे प्रा. नाडकर्णी सर, मार्गदर्शक अमर हबीब व प्राचार्य बी आय खडकभावी सर यांनी आपल्या मनोगतातून सानेगुरुजीचे विचार, आंतरभारतीचा उद्देश व कार्यप्रणाली याविषयी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. शैलजा बरुरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचन ऍड. प्रवीण बजाज यांनी केले.

आंतरभारतीचे सभासद, गावचा सामाजिक वारसा पुढे नेणारे नागरिक तथा प्रा. डॉ. विवेकानंद राजमान्य सरांचे सहकारी, कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

error: Content is protected !!