*आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीत* *उभे राहात आहे, भव्य “पत्रकार भवन*
*आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीत*
*उभे राहात आहे, भव्य “पत्रकार भवन*
पुणे : महाराष्ट्रातील पत्रकारांना भूषणावह वाटेल असे भव्य-दिव्य, चार मजली आणि अत्याधुनिक सोयींनीयुक्त असे पत्रकार भवन आचार्य अत्रे यांच्या पावनभूमीत पुरंदर येथे उभारले जात आहे.. पाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या पत्रकार भवनाच्या पहिल्या स्लॅबचा भरणी कार्यक्रम अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आला..
नियोजित विमानतळ, जेजुरी आणि सासवडच्या मध्यावर पत्रकार भवनाची वास्तू उभारली जात आहे.. येथे कॉन्फरन्स हॉल, मिडिया सेंटर, पत्रकारांसाठी चार सूट, विविध कार्यक्रमासाठी मोठा हॉल, सुसज्ज ग्रंथालय उभारले जाणार आहे.. एमपीएससी आणि युपीएससीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून राज्यातील पत्रकारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील येथे करण्यात येणार आहे.. विशेष म्हणजे सरकारची दमडीचीही मदत न घेता लोकवर्गणीतून या पत्रकार भवनाची वास्तू उभी राहणार आहे..
तालुका स्तरावर एवढी भव्य-दिव्य, अत्याधुनिक वास्तू अन्यत्र कोठेही नसल्याचे एस.एम.देशमुख यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट करून वास्तू उभारण्याचे शिवधनुष्य पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाने लिलया पेलल्याबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले. राज्यातील अन्य तालुका पत्रकार संघांनी पुरंदर चा आदर्श घ्यावा असे आवाहनही एस.एम.देशमुख यांनी केले आहे..
माजी आमदार संजय जगताप यांनी देखील पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन करून आपण पत्रकार भवनासाठा भरीव मदत करू असे आश्वासन दिले आहे..
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी प्रास्ताविक करताना पत्रकार भवनासाठी मदत करणारया देणगीदारांचे
बीएम काळे यांनी आभार मानले..
वर्षभरात पत्रकार भवन उभे करण्याचे पत्रकार संघाचे प्रयत्न आहेत..
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नाना भोंगळे, एम. जी. शेलार, सुनील वाळुंज, प्रमोद गव्हाणे तसेच जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..
