Skip to content
प्रभू वैद्यनाथ देवस्थानच्या इनामी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत – पुजाऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु
परळी, ता. १० जून – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पावन प्रभू वैद्यनाथ देवस्थानच्या इनामी जमिनीवर भूमाफियांकडून अतिक्रमण करण्यात आले असून, न्यायालयीन आदेश असूनही शासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने देवस्थानचे समस्त पुजारी बुधवार, दि. ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, परळी समोर उपोषणास बसले आहेत.

माननीय उच्च न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परळी तहसील मंडळ अधिकारी यांनी वेळोवेळी संबंधित सर्वे नंबर परिसरात तीन वेळा भेट देऊन अतिक्रमण असल्याचा अहवाल सादर केला आहे. रिट केस नं. १८६/२००८ मध्येही जमिनीवरील अतिक्रमणाबाबत स्पष्ट निर्णय झालेला असून, दिनांक १७ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पुजाऱ्यांनी केलेल्या ठळक मागण्यांमध्ये, देवस्थानच्या इनामी जमिनीतून ताबडतोब अतिक्रमण हटवावे व ती मूळ स्वरूपात देवस्थानच्या ताब्यात द्यावी, असा ठाम आग्रह आहे.
उपोषणाचे ठळक मुद्दे:
न्यायालयीन निर्णय असूनही अतिक्रमण कायम.
शासनाकडून अद्याप अंमलबजावणी नाही.
२०२१ व २०२४ मध्ये तहसील मंडळ अधिकाऱ्यांच्या भेटी व अहवालानंतरही निष्क्रियता.
भाविकांच्या आस्थेचा प्रश्न; धर्मस्थळाचा अपमान.
याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याची आणि जमिनीचा ताबा देवस्थानकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे.
“देवस्थानच्या इनामी जमिनी सर्वे नं. ३२२ मधील अतिक्रमण तात्काळ दूर करून ती जमिन ताब्यात द्यावी” अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली असून भाविकांनी या उपोषणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 877
error: Content is protected !!