वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची बुधवार पेठेत निर्घृण हत्या, रोज भेटायला येणाराच निघाला मारेकरी
वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची बुधवार पेठेत निर्घृण हत्या, रोज भेटायला येणाराच निघाला मारेकरी
पुणे
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१, रा.सिंहगड रस्ता, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, मृत महिलेचे नाव श्यामली (वय ४०, रा. धायरी, रायकर मळा) असे आहे.
ही घटना शनिवारी घडली असून, नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तपास करत आरोपी नितीन पंडितला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, मृत श्यामली आणि आरोपी नितीन यांची पूर्वीपासून ओळख होती. श्यामली दररोज रात्री बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी जात असे आणि नितीन हा रिक्षा चालक असून तो तिला तिथे सोडण्याचे व परत आणण्याचे काम करत होता. यातून दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते.
ओळखीमुळे श्यामलीने नितीनकडून सुमारे ४० ते ५० हजार रुपये घेतले होते. नितीन वारंवार पैशांची मागणी केल्यानंतरही श्यामली पैसे परत करत नव्हती. घटनेच्या दिवशीही पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात नितीनने श्यामलीचा ओढणीने गळा आवळून खून केला. नांदेड सीटी पोलिसांनी आरोपी केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
