सेवानिवृत्त शिक्षिकेला सायबर भामट्यांनी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत तब्बल ८३ लाख रुपयाला लुटले, अंबाजोगाई मधील घटना
सेवानिवृत्त शिक्षिकेला सायबर भामट्यांनी
आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत तब्बल ८३ लाख रुपयाला लुटले, अंबाजोगाई मधील घटना

आंबजोगाई
मी महाराष्ट्र पोलिस बोलत असून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडींग झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा असे म्हणत व्हाट्सअपला व्हिडीओ कॉल करून निवृत्त शिक्षिकेला डीजिटल अरेस्ट केली. त्यानंतर २१ ते २९ मे या दरम्यान तब्बल ८३ लाख रूपये ऑनलाईन हडप केले असून याप्रकरणी बीड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामटे वेगवेगळे बहाणे करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येत असल्याने पोलीस प्रशासना कडून नागरिकांना दक्ष राहण्या बाबत सूचित करण्यात येत असते. तरीही हे भामटे प्रत्येक वेळी नवीन फंडा हा शोधत असतात. असाच एक फंडा त्यांनी
आंबजोगाई शहरातील एका 65 वर्षीय निवृत्त शिक्षिके सोबत वापरला असून २० मे रोजी एका अनोळखी क्रमांकावरून या निवृत्त शिक्षिकेच्या मोबाईल वर एक कॉल आला. मी महाराष्ट्र पोलीस संजय पिसे बोलतो असे त्याने सांगितले. नंतर हिंदी भाषेत तो म्हणाला की तुमच्या आधारकार्डवरुन दुसरे सिमकार्ड १६ एप्रिल रोजी घेतले गेले आहे. या सीमकार्डच्या माध्यमातून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रीग व अतिरेक्यांना फंडींग झाली आहे. तुम्ही तीन दिवसात सर्व सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला यातुन सोडवु. यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेब यांना स्पेशली विनंती केल्याचा विश्वास दिला.
त्यानंतर आरोपींनी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे मुंबई पोलिसांचे ऑफिस, झेंडे, लोगो दाखवून खोटे वातावरण निर्माण केले. “डिजिटल अरेस्ट”मध्ये असल्याचे सांगून, भीती दाखवत शिक्षिकेकडून आर्थिक व्यवहार करवून घेतले. हे सर्व खरे असे समजून सावित्री यांनी २१ मे रोजी पहिल्यांदा एकाचवेळी ३५ लाख १० हजार रूपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी त्यांनी २९ मे पर्यंत ८३ लाख १ हजार ८१६ रूपये सायबर भामट्यांना पाठविले.
या दरम्यान पीडित शिक्षिकेला सातत्याने फोन व व्हिडिओ कॉल करत त्यांच्यावर दडपण आणले जात होते. ३० मे रोजी गुन्हेगारांनी व्हॉट्सअपवरून त्यांना ब्लॉक केले आणि फोन बंद केला. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा तपास बीड सायबर पोलिसांनी हाती घेतला असून नागरिकांनी अशा बनावट कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधारकार्ड, बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नये आणि संशयास्पद कॉल आल्यास त्वरित नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सायबर भामट्यांनी सावित्री यांना भिती दाखवत तुमच्याकडे कोणती संपत्ती आहे, हे आम्हाला येथे दिसते. तुम्ही लपवुन ठेवु नका, असे सांगितले. त्यानंतर सावित्री यांनी सोने, प्लॉट गहान ठेवुन त्यावर कर्ज घेतले आणि २९ मे रोजी हे सर्व पैसे भामट्यांना ऑनलाईन पाठविले.
