ताज्या घडामोडी

*अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला 14 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा* *अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल*

*अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला 14 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा*

*अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासत अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या श्याम दिगंबर वारकड या शिक्षकास अंबाजोगाई सत्र न्यायालयाने 14 वर्ष सश्रम कारावास आणि एकूण एक लाख 2000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर विद्यालयांमध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी क्रीडा शिक्षक श्याम दिगंबर वारकड याच्यासोबत जालना येथे गेली होती.स्पर्धेतून परतत असताना वाहनांमध्ये शिक्षकाने तिच्यासोबत छेडछाड केली. जालन्याहून परत आल्यानंतर अंबाजोगाई येथील क्रीडा संकुल परिसरात वाहनांमध्ये 17 ऑक्टोबर रोजी श्याम वारकड याने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कोणालाही सांगू नकोस असे शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकावले होते. त्यानंतर त्या मुलीवर नराधम शिक्षकाने अनेक वेळा अत्याचार केल्याचेही समोर आले. पीडित मुलगी भयभीत अवस्थेमध्ये होती. तिची अवस्था शाळेमधील एका महिला शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर तिने विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर या घटनेचे बिंग फुटले. त्या मुलीने अंबाजोगाई शहर पोलीसांमध्ये तक्रार दिल्यानंतर श्याम वारकड याच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डीवायएसपी राहुल धस यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या.खोचे यांच्यासमोर झाली. न्यायालयासमोर एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीतेची आणि तिच्या आईची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने श्याम वारकड यास दोषी ठरवून 14 वर्ष फक्त मजुरी आणि एक लाख 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी म्हणून गोविंद कदम आणि बाबुराव सोडगीर यांनी सहकार्य केले.
*खटल्याकडे होते शहराचे लक्ष*
मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर असणाऱ्या अंबाजोगाई सारख्या शहरात शिक्षकानेच असे घृणास्पद कृत्य केल्याने संतापाची लाट उसळली होती. अंबाजोगाईकरांनी मोर्चे काढून या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या खटल्याकडे संपूर्ण अंबाजोगाई तालुक्याचे लक्ष लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!